आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तापमान:पारा घसरणार; पुढच्या आठवड्यात बोचरी थंडी

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरूवात झाली आहे. सद्यः स्थितीत किमान तापमान हे १६ ते १७ अंश सेल्सिअसवर आहे. पुढील आठवड्यात विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमान हे १२ ते १५ अंशांवर जाऊन जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचे आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे.

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमालयावर पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. तसेच हवेच्या खालच्या थरात वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहेत. त्याच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. त्याचप्रमाणे विदर्भात सुद्धा तापमान घसरले आहे. शनिवारी ५ नोव्हेंबरला एक नवीन पश्चिमी चक्रवात पश्चिम हिमालयाला बाधित करणार आहे.

त्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळे पुढील आठवड्यात विदर्भातील तापमानात थोडी घट होऊ शकते. पुढील दहा दिवस कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर तर किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

व्याधींमुळे वृद्ध त्रस्त
थंडीमुळे ज्येष्ठांना सांधे दुखीचा त्रास हाेत आहे. याशिवाय आबालवृद्धांमध्ये त्वचेच्या तक्रारी समोर येण्यास सुरूवात झाली आहे. तसेच श्वसन विकाराशी संबंधित तक्रारी दिसून येत आहेत.

१३ दिवसांपासून सुरुवात : २३ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. पुढील आठ दिवस म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत किमान पारा १७ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत राहिला. १ नोव्हेंबरपासून पुन्हा १६ ते १७ अंश असे तापमान राहत आहे.

हवामानात सातत्याने बदल
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसले. अतिवृष्टीनंतर सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवले. ऑक्टोबरमध्ये पुन्हा परतीच्या पावसामुळे काही दिवस हवेत गारवा तर काही दिवस उकाडा जाणवला. गेल्या पंधरवड्यापासून गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. यामध्ये आठ दिवसात घट होण्याची शक्यता असली तरी दुसरीकडे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...