आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:‘लम्पी’मुळे दूध विक्रेते अडचणीत; गाईच्या दुधाची विक्री 50%घटली

अकाेला / करुणा भांडारकर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांना हाेणाऱ्या लम्पी आजारामुळे जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहे. गाईच्या दुधाच्या विक्रीत ५० टक्के घट झाल्यामुळे त्यांच्या समाेर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान त्यात समाज माध्यमांवर दररोज विविध संदेश व्हायरल होत आहेत. यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांच्या सेवनाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. या अफवांमुळे गाईच्या दुधाची विक्री तब्बल ५० टक्के, तर दुग्धजन्य पदार्थ्यांची विक्री २५-३० टक्के घटली आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा सर्वच उत्सव जल्लोषात साजरे करण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवामुळे उद्योग, बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. व्यवसायिकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहे. अशात दुध डेअरी व्यवसायाला जनावरांना हाेणाऱ्या ‘लम्पी’ आजारामुळे ग्रहण लागले आहे. उत्सव काळात प्रसाद, उपावास, समारंभ आदींसाठी घरोघरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठी असते.

अनेकदा दुग्धजन्य पदार्थ्यांची टंचाई जाणवते, परिणामी भेसळयुक्त पदार्थ विकले जातात. परंतु, यंदा चित्र विरूद्ध आहे. जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी आजारामुळे दूध , पनीर, लोणी, दही, बासुंदी, श्रीखंड असे दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे नागरिकांकडून टाळले जात आहे. मुख्य म्हणजे प्रशासनाकडून वारंवार याबाबत जागरूकता करण्यात येत आहे. पण लोकांच्या मनामध्ये भीती आहे. यामुळे दूध डेअरी व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

ग्राहकांकडून हाेणाऱ्या चौकशींमुळे त्रस्त
दूध खरेदी करण्यापूर्वी ग्राहक वारंवार चौकशी करतात. आपल्या जनावरांना लम्पी आजार तर झालेला नाही, त्यांचे लसीकरण झाले का?, तुम्ही स्वच्छता विषयक काळजी योग्य प्रकारे घेता की नाही? दिवसभर ग्राहकांच्या या प्रश्नांना तोंड द्यावे लागते.
बळीराम पांडव, दूध विक्रेते.

नगदी विक्रीवर परिणाम
सध्याच्या काळात दुधाचे पदार्थ खाणे टाळण्याकडे कल आहे. नगदी ग्राहकांद्वारे होणारा व्यवसाय कमी झाला आहे. २५-३० टक्के नगदी ग्राहकांची संख्या रोडावली आहे. यामुळे एकूण व्यवसायाला मोठा फटका बसत आहे.
संगप्पा चौधरी, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, कृषी नगर