आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील किमान तापमानात सलग दोन दिवसांपासून घसरण होत आहे. गुरुवारी २.७ अंशाने तापमान घसरून किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवले. तर शुक्रवारी त्यामध्ये आणखी घट होऊन १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी पहाटे वातावरणात कमालीचा गारवा जाणवला. वाढत्या गारव्याचा जनजीवनावर परिणाम जाणवला. किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसाची शक्यताही व्यक्त केली जात होती.
मात्र हे वातावरण निवळल्यानंतर उकाडा, त्यानंतर तीन दिवसांपासून आता सकाळ आणि सायंकाळी हवेत गारवा राहत आहे. ग्रामीण भागात रब्बी हंगामातील गहू आणि हरभऱ्याच्या पिकाचे ओलीत असल्याने शहराच्या तुलनेत अधिक थंडी जाणवत आहे. त्यामुळे रात्री पिकांना पाणी देणेही कठीण होत आहे. अकोला शहरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. त्यामुळे नागरिकांना स्वेटर आणि मफरलचा आधार घ्यावा लागला. तर ग्रामीण भागात दोन दिवसांपासून पुन्हा शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. वाढत्या थंडीपासून आबालवृद्धांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिकांमध्ये धूर करा जिल्ह्यात हवामान कोरडे व थंड असल्याने हरबरा, संत्रा व भाजीपाला पिकांमध्ये थंडीचा दुष्परिणाम रोखण्यासाठी पिकास वारंवार हलके ओलीत करावे व थंडीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी पिकात सायंकाळ व रात्री काडी कचऱ्याचा धूर करावा, असा सल्ला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे. प्रामुख्याने फळबागांमध्ये वाळलेली पाने, शेणाच्या गोवऱ्या किंवा काडी, कचरा जाळून धूर केल्यास बागेतील तापमान वाढण्यास मदत होते व पिकांचे संरक्षण होते. मात्र जाळ किंवा शेकोट्या करताना झाडांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.