आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:मुलीचा विनयभंग; दोघांना सात वर्षे सश्रम कारावास ; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरात घुसून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने शुक्रवारी दिला. आकाश गजानन राठोड व अमित गोपाळ चव्हाण (रा. खडका ता. अकोला) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अल्पवयीन मुलगी शाळेत जायची तेव्हा दोन्ही आरोपी तिचा पाठलाग करून तिची छेड काढत असत. ४ सप्टेंबर २०२० रोजी पीडित मुलगी तिच्या बहीणीसह घरात असताना आरोपी आकाश राठोड हा तिच्या घरात घुसला व त्याने मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडा- आरोड केल्यानंतर तो पळून गेला. मुलीने तिच्या आईला घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर दोघी मायलेकी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गेल्या. तिथे त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदविचे कलम ३५४, अ,ड, ४५२,५०६ तसेच पॉक्सो कायद्याचे कलम ७,८ व ११,१२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विना पंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विशेष न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सर्वच गुन्ह्यात शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. या कलमान्वये अशी ठोठावली शिक्षा ः आरोपी आकाश गजानन राठोड व अमित गोपाळ यांना भादंविचे कलम ३५४ कलामामध्ये मध्ये दोषी ठरवून पाच वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, ३५४ अ कलामामध्ये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, ३५४ ड कलामामध्ये मध्ये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, ४५२ कलामामध्ये दोषी ठरवून सात वर्ष सक्तमजुरी १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, ५०६ कलामामध्ये दोषी ठरवून दोन वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच पॉक्सो कायदाच्या कलम ७, ८ मध्ये दोषी ठरवून पाच वर्ष सक्तमजुरी १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, पॉक्सो कायदाच्या कलम ११, १२ मध्ये दोषी ठरवून तीन वर्ष सक्तमजुरी पाच हजार रूपये दंड दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगवयाच्या आहेत. दंडाची एकूण रक्कम प्रत्येकी ४५ हजार रूपये आरोपी कडून वसूल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस व अर्धी रक्कम शासनास देण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...