आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणात नोकरीच्या नावाखाली फसवणूक:पैसे वसूल करणारी टोळी अकोल्या जिल्ह्यात सक्रिय; नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीत कंत्राटी नोकरी लावून देतो, असे सांगून नागरिकांकडून पैसे वसूल करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. अशा टोळीपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

सावधगिरी बाळगावी

महावितरणकडून अकोला जिल्ह्यात कार्यालयीन सहाय्यक, उपकेंद्र चालक, विदुयत सहाय्यक आदी जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात. यासाठी रितसर निविदा काढून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाते. कार्यालयीन सहाय्यक, उपकेंद्र चालक, विद्यूत सहाय्यक आदी पदांसाठी विहित शैक्षणिक अहर्ता धारण करणारे उमेदवार कंत्राटी सेवा पुरवरणारी संस्था पुरवते. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

महावितरणाचे आवाहन

जर कोणी नागरिकांकडून महावितरणमध्ये नोकरी लावून देतो, अशी भूलथापा देऊन पैसे मागत असेल तर याची तक्रार थेट पोलिस ठाण्यात करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

असे करतात प्रयत्न

अकोला परिसरातील काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून प्रलोभन दिले जात असल्याचे आढळून आले आहे. महावितरणमध्ये अस्तित्वात नसलेल्या पदांसाठीही निवड करण्याचे प्रलोभन दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई येथून संपर्क करीत असल्याचे उमेदवारांना सांगितले जाते आणि निवड पत्र पाठवण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न होत आहेत.

पदे नसताना निवडपत्र

काही पदे महावितरणमध्ये अस्तित्वात नाहीत, अशाही पदांसाठी निवडपत्राचे प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, महावितरणकडून संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान तसेच निवड पत्र किंवा रूजू होण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रलोभनाला बळी पडू नका!

यासोबतच संबंधित उमेदवारांना नोंदणी केलेल्या त्यांच्या ई-मेलवर व मोबाईलवरही भरती प्रक्रियेबाबतची माहिती दिली जाते. निवड झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते व संबंधीत उमेदवारांना इ-मेलद्वारे व लेखी पत्राद्वारे कळविले जाते. महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रलोभनासाठी आर्थिक मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहवे.

-अजित इगतपुरिकर, प्रसिद्धी प्रमुख अकोला महावितरण परिमंडळ