आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान!:बनावट ‘एसएमएस’ पाठवून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक; वैयक्तिक मेसेजला प्रतिसाद देऊ नका, महावितरणचे आवाहन

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ला कोणताही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ग्राहकांची होती आहे फसवणूक

मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट ‘एसएमएस’ पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच पुणे शहरातील एका ग्राहकाला असाच बनावट ‘एसएमएस’ पाठवून ऑनलाईनद्वारे 22 हजार रुपये लुबाडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने सायबर सेल पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. यासोबतच महावितरणकडून देखील बनावट ‘एसएमएस’ प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

असा करतात संपर्क

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरुन आज रात्री 9.30 वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्सअ‌ॅप मेसेज पाठवण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बनावट लिंकवरुन लूबाळणूक

महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठवण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा ‘एमएसईडीसीएल’ (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळवले जात नाही. मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवण्यात येत आहे.

बनावट लिंककडे दुर्लक्ष करा

तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करुन बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.

अशी घ्या खबरदारी

बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करु नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या 1912 -18001023435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांक किंवा जवळ असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधावा

बातम्या आणखी आहेत...