आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण नियंत्रण:डम्पिंग ग्राउंडवर मनपा उभारणार दोन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वाढलेल्या प्रदूषणावर उपाय योजना करण्यासाठी शासनाकडून महापालिकेला १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून डम्पिंग ग्राउंडवर २ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अथवा शहरातील स्मशानभूमीत दहन वाहिका उभारण्याचे काम केले जाणार आहे.शहरात वाढलेली लोकसंख्या, वाढलेली वाहनांची संख्या, कमी झालेले वृक्ष, पाण्याचा अपव्यय, वृक्षतोड, सतत होत असलेले काँक्रिटीकरण, पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी सुरु असलेले तोकडे प्रयत्न, ५० मायक्रॉनपेक्षा कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्यांचा सुरु असलेला सर्रास वापर, सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणे आदी विविध कारणांमुळे नदीचे पाणी, हवा, वातावरण आदी सर्वत्र प्रदूषणात वाढ झाली आहे.

त्यामुळे निसर्गही लहरी झाला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तर दहा दिवसांचा पाऊस एकाच दिवसात हजेरी लावून जातो. यामुळे निसर्ग चक्र विस्कळीत झाले आहे.त्यामुळे प्रदूषणाला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरु आहेत. सांडपाणी थेट नदीत न सोडता, यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना, शहरात ग्रीन स्पेस निर्माण करुन झांडाची संख्या वाढवणे आदी उपाय सुरू आहेत.

शहरात भूमिगत गटार योजनेतील पहिल्या टप्प्याचे काम झाले आहे तर शहराच्या विविध भागात २१ ग्रीन स्पेस तयार करण्यात आले आहे. तसेच भूजलाची पातळी वाढावी, यासाठी १०० शोेष खड्डे तयार करण्यात आले आहे. तर आता शासनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी एक कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. या निधीच्या खर्चाचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.

अन्य निधीतून पैसे वळते करण्यासाठी चाचपणी
शहरात डम्पिंग ग्राउंडवर कचरा संकलीत केला जातो. मात्र आता येत्या काही महिन्यात ही जागा रिकामी होणार आहे. डंम्पिंग ग्राउंड भोड जवळ जाणार आहे. या जागेत २ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र, १ कोटी ३० लाख रुपयात हा प्रकल्प उभारता येत नाही.

त्यामुळे अन्य निधीतून या प्रकल्पात ७० -८० लाख वळते करता येतील का? याची चाचपणी सुरु आहे. जर हा प्रकल्प होवू शकला नाही तर शहरातील पाच स्मशानभूमीत ईलेक्ट्रिक अथवा गॅसवर चालणारी दहनवाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, एका दहन वाहिनीसाठी ७५ ते ८० लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर दोन स्मशानभूमीत दहनवाहिनी उभारण्याचाही प्रशासनाचा मानस आहे. या दोनपैकी एका प्रकल्पावर हा निधी खर्च केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...