आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका नगररचना विभागात कायम नगररचनाकार नसल्याने नगररचना विभागाचे कामकाज कोलमडले आहे. गुंठेवारी नियमानुकुलच्या 500 फाईल्स रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर महापालिकेला लाखो रुपयाच्या महसुलापासून महापालिकेला वंचित राहावे लागत आहे.
महापालिकेत नगररचना हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. शहरातील सर्व बांधकामांना मंजुरी देण्याचे काम नगररचना विभागाकडून केले जाते. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने आता क्षेत्रफळातही वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम मंजुरीच्या फाईल्स तसेच गुंठेवारीचे नियमानुकुलचे काम ऑफ लाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे फाईल्सचा ढिग लागला आहे. तुर्तास जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागातील राजय साबळे यांच्याकडे महापालिका नगररचना विभागाचा प्रभार आहे. तर नागपूर येथील सादिक गजफ्फर अली यांच्याकडेही महापालिकेचा प्रभार आहे.
राजय साबळे हे ऑनलाईन पद्धतीच्या फाईल्सचे काम पाहात आहेत. एकाच वेळी दोन्ही ठिकाणचे काम करावे लागत असल्याने ऑफलाईन फाईल्स तपासण्यास त्यांना वेळ मिळत नाही. तर नागपूर येथील सादिक गजफ्फर अली हे केवळ एकदा महापालिकेत आले. अकोला ते नागपूरचे अंतर अधिक असल्याने ते महापालिकेला किती वेळ देणार? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे गुंठेवारी नियमानुकुलच्या फाईल्स रखडल्या आहेत.
रिक्तपदामध्येच भर
महापालिकेत कार्यरत कर्मचारी दर महिन्याला सेवा निवृत्त होत आहेत. तर अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असताना आता कायम स्वरुपी नगररचनाकारही महापालिकेत नाही. नगररचनाकार पदाचाही प्रभार असल्याने महापालिकेत रिक्तपदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे केवळ रिक्तपदांच्या संख्येत वाढ होत आहे.
महापालिका महसुलापासून वंचित
गुंठेवारी नियमानुकुलचे दोन हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी 500 प्रकरणाची मंजुरी रखडली आहे. तर उर्वरित प्रोसेस मध्ये आहेत. या फाईल्स मंजुर होत नसल्याने महापालिका लाखो रुपयाच्या महसुलापासून वंचित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.