आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र विशेष, जागर कर्तृत्वाचा:नक्षलवादी ते सभापती : गिरिजा भलावीची थरारक कहाणी

हेमंत डोर्लीकर | गडचिरोली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रूपांचा जागर. त्यांचे नमन करतानाच आजच्या काळात या रूपांना अनुसरून कार्य करणाऱ्या आधुनिक स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा हा जागर. ​​​​​​​

अज्ञानातूनच नक्षलवादी दलममध्ये झालेला सहभाग, वाट्याला आलेले खडतर आयुष्य,अटक व कारावास, नक्षलवाद्यांनी केलेली पतीची हत्या, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दिलेला न्यायालयीन लढा, चरितार्थासाठी पिकवणारी शेती व गावाच्या विकासापासून पंचायत समिती सभापतिपदापर्यंत मारलेली मजल... गिरिजा भलावींनी एवढ्या टोकाच्या नाट्यपूर्ण आयुष्याला सामोरे जात शांतता आणि कल्याणकारी रूपाचा आदर्श आपल्या जगण्यातूनच दाखवून दिला आहे.

चंद्रघटा हे आजचे देवीचे रूप शांतीमयी, कल्याणकारी. पण यासाठी गिरिजा यांना खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. गडचिरोलीच्या टोकावर वसलेल्या आरेवाडा या छोट्याशा गावातील कुडीयामी परिवारात गिरिजा यांचा जन्म झाला. खरं तर चळवळ, विचार काही माहीत नव्हतंं, अशा अल्लड वयातच १९९२ साली त्या नक्षलवाद्यांसोबत गेल्या आणि नक्षली बनल्या. तिथेच दलममधील पवनकुमार भलावी यांच्यासोबत त्यांचे लग्नही झाले. त्यानंतर १० वर्ष त्या नक्षली म्हणून खडतर आयुष्य जगत होत्या. २००१ मध्ये त्यांच्या पतीची तब्येत बिघडली आणि ते गोंदियात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. गिरिजा त्यांची सेवा करीत होत्या. पोलिसांना सुगावा लागला आणि या दांपत्याला अटक झाली. अटक झाल्यानंतरही न डगमगता जेलमध्ये राहून खंबीरपणे त्यांनी अटक झाली. त्यानंतरही त्यांनी अँड सुरेंद्र गडलींग यांच्या मदतीने कायदेशीर लढा पूर्ण केला आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली. नक्षलवाद सोडून हे दांपत्य नागरी जीवनात आले आहे. पण जनसेवेची कळकळ त्यांना शांत बसून देत नव्हती. २००५ साली त्या भामरागड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून सदस्य झाल्या. तेवढ्यावरच न थांबता २००७ मध्ये भामरागड पंचायत समितीच्या सभापतीपदापर्यंत पोहोचल्या. दऱ्याखोऱ्यातील आदिवासींपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी झगडल्या. अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. २०१२ त्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पडल्या. कारणही तसेच गंभीर होते. २० एप्रिल २०१२ रोजी आरेवाडा येथे त्यांच्या शेताजवळच नक्षलींनी त्यांच्या पतीची हत्या केली होती. पण त्या डगमगल्या नाही. लोकसेवेचा एकाकी वसा त्यांनी सुरू ठेवला. विशेष म्हणजे, राजकारण हे वैयक्तिक स्वार्थाचे नाही तर विकासाचे साधन म्हणून त्या बघतात. स्वत:चे पोट भरण्यासाठी त्या शेतात राबतात. मत्स्यपालन, कुक्कुटपालन यासह प्रगतीशील शेती करतात.

राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची त्यांची इच्छा आजही आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात सुरू झालेल्या बजबजपुरीत त्यांना संधी नाही. लोकांनी संधी दिली तर त्यांची इच्छा आहेच आणि त्यांनी स्वत:ला सिद्धही करून दाखविले आहे.

बातम्या आणखी आहेत...