आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलसा गाताना मला जी उर्जा मिळते, ती आमच्या बहुजन समाजाच्या बहिणींकडून मिळते. आंबेडकरी चळवळीत ज्या महिला दुर्लक्षित आहेत, त्यांचा पाच ते दहा वर्षात एक नवा पक्ष उभा राहील. तो पक्ष समाजाचे नेतृत्व करणारा असेल आणि बहुजन समाज त्याला जोडेल. त्यांना भीती वाटणार नाही. ते युगायुगाचे साचलेले असल्याने माेठे रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही,’ असे भाष्य आंबेडकरी जलसा म्हणून नावारूपास आणणारे शाहीर संभाजी भगत यांनी केले.
‘ दिव्य मराठी’ कार्यालयात सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते. सामाजिक, राजकीय व धार्मिक विषयांवर शाहीर संभाजी भगत यांनी परखड मत मांडले. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीसत्ताक होते. महाराष्ट्रातील जनतेच्या नसानसांमध्ये हे दाेन महापुरुष आहेत. कितीही नाकारले तरी ते पेरलेल्या बीजसारखे उगवणारचं.
डाॅ. आंबेडकरांनी धर्म स्वीकारला म्हणजे कुण्या धर्माचा तोटा केला, असे नाही, कारण जे कधी धर्मात नव्हते ते गावकुसाबाहेरच होते त्यांनीच डाॅ. बाबासाहेबांचा धर्म स्वीकारला. म्हणजे एक प्रकारे बाहेरचा माणूस बाहेर गेला म्हणून कुण्या धर्माचा तोटा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
परिस्थितीत घडलेले नेते आणि परिस्थितीने घडवलेले नेते असे दोन प्रकार आहेत. डाॅ. बाबासाहेबांनी परिस्थिती घडवली आहे. आंबेडकरी राजकीय पक्षामध्ये केडर नाही. आमच्यात खूप चुका आहेत, आम्ही ट्रेनिंग देत नाही, त्यासाठी लाँगटर्म काम करावं लागेल, असेही भगत म्हणाले.
जलसाचे सादरीकरण करताना इतका जोश कसा येतो, यावर संभाजी भगत म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांच्या काळात जलसा होता. मधल्या काळात कव्वाल्यासारखे प्रकार आले आणि जलसा मागे पडला. मी त्याच जलशाचे पुनरूज्जीवन केले आहे.
आज, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब असते तर ते काय म्हणाले असते, त्यांनी काय विचार केला असता, हेच जलसातून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. मी कंठाने कधी गात नाही, गाणं तत्त्वज्ञानाच्या पाेटातून गातो, ही तत्वज्ञानाची, विचारधारेची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.