आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी:सोयाबीनचे घरचे बियाणे पेराल तर अशी तपासा उगवण क्षमता; कृषी विद्यापीठाचा सल्ला

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून निर्माण होणारा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा आणि यंदाची बियाण्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ पाहता शेतकरी वर्ग घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे असे बियाणे वापरताना त्यावर बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमतेची चाचणी करून बियाणे वापर करा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

एकरी 24 ते 26 किलो बियाणे वापरा

सोयाबीनची चाळणी आणि बिजप्रक्रिया करून तयार असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासा. उगवणक्षमता 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास वाणानुरूप एकरी 24 ते 26 किलो बियाणे वापरावे. उगवणक्षमता तुलनात्मकदृष्टया कमी असल्यास (60 टक्के पर्यंत), जितकी उगवणक्षमता कमी असेल (70 टक्के पेक्षा) अंदाजे तितके किलो बियाणे पेरणीसाठी जास्त वापरावे, असे तज्ज्ञ सांगतात.

अशी करा साठवणूक

बी साठवणूक करताना दाण्यात ओल्याव्याचे प्रमाण 10 टक्के पेक्षा जास्त नसावे. बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे, जेणे करून खालची ओल बियाण्याला लागणार नाही व बियाणे खराब होणार नाही. साठवणूक करताना जास्तीत जास्त 5 पोत्याची थप्पी लावावी. त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने ठेवावे. अन्यथा गोदामाच्या आत गरम जागा तयार होईल. ज्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती खूप लवकर कमी होते.

अशी तपासा उगवण शक्ती

  • घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढा
  • सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्या.
  • गोणपाटाचे 6 चौकोनी तुकडे करा. ते स्वच्छ धुवून घ्या.
  • काढलेल्या धान्यातून सरसकट 100 दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर 10-10 च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा.
  • अशाप्रकारे 100 दाण्याचे तीन नमुने तयार करा.
  • गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओला करा. बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी शिंपडा.
  • गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवा.
  • 6 ते 7 दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा.
  • तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून शंभर दाण्यापैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे गुणवत्तेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...