आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Now The Robot Can Go Directly To The Ward And Give Medicine To Coronary Patients; Dr Santosh Surdakar And His Team Created This Robot In Barshitakli College, Akola News And Updates

मंडे पॉझिटिव्ह​​​​​​​:आता रोबोटच देऊ शकेल थेट वॉर्डात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांना औषधी; लवकर बरे होण्याचा आशावाद निर्माण होईल

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीच्या गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील डॉ. संतोष सुरडकर यांच्या टीमची निर्मिती

जगभरात कोरोनाने कहर केला असून नव्या बाधितांसह मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या महामारीशी लढताना स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना वॉरियर्स अर्थात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, यादरम्यान अनेक योद्ध्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्याचा रुग्णसेवेवरही परिणामही झाला. याच योद्ध्यांना मदत म्हणून रुग्णांना वेळेवर अचूक गोळ्या-औषधी देणारा मोबाइल रोबोट बार्शी टाकळी (जि. अकोला, मूळ गाव जालना) येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष वामनराव सुरडकर यांच्या टीमने तयार केला आहे. आयओटी अर्थात इंटरनेट बेस्ड स्मार्ट मेडिसिन डिस्पेन्सिंग सिस्टिम इन हॉस्पिटल अशी ही संकल्पना असून इंडियन पेटंट ऑफिसने हे संशाेधन ५ मार्च रोजी जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे. यावर कुणाचे अाक्षेप अाले नाहीत तर हे पेटंट मंजूर हाेईल.

आपण वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर नाहीत तरीसुद्धा या संकटाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला हातभार लावायचा, असा निश्चय करून या टीमने नवतंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला. यासाठी नियमित बैठका तर कधी मोबाइलद्वारे एकमेकांशी संपर्क करून तासन््तास सखोल चर्चा घडवून आणल्या. यातूनच कोरोना वॉरियर्सच्या उपयोगात येईल असे डिव्हाइस अर्थात रोबोट तयार करायचे सुचले व त्यानुसार कामही सुरू केले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हाती घेतलेले हे काम पूर्ण हाेण्यासाठी जानेवारी २०२१ उजाडले. मात्र, यातून जे साध्य झाले ते नक्कीच कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावणारे असेल, असा विश्वासही या टीमला वाटतो..

लवकर बरे होण्याचा आशावाद निर्माण होईल
डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रोबाेटही उपचारात सहभागी झाल्यामुळे आपल्यावर मोठ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार हाेत अाहे असे रुग्णास वाटेल. यामुळे आपण लवकर बरे होऊन आपल्या घर-कुटुंबात जाऊ असा विश्वासही रुग्णांमध्ये निर्माण होण्यास या रोबोटची मदत होईल. मनातील भीती कमी होऊन यामुळे रुग्णांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकेल. गुलाम नबी आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्याने रोबोटची निर्मिती केली. इंडियन पेटंट ऑफिसकडून हे संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून ग्रँड मिळताच इच्छुक शासकीय यंत्रणा किंवा आंत्रप्रेन्योर्स रोबोट निर्मितीसाठी पुढे येतील. त्यानंतर हा रोबोट प्रत्यक्ष रुग्णाच्या सेवेत येईल. या यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. आर. आर. राठोड, आयक्यूएसी समन्वयक प्रा. ए. बी. पाटील, डॉ. सिद्धार्थ वाघमारे आदींनी डॉ. सुरडकर यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

रोबोटची कामाची पद्धती अशी
या डिव्हाइसमध्ये सॉफ्टवेअर व हार्डवेअर असे दोन भाग आहेत. सॉफ्टवेअर या सिस्टिमचा आत्मा असून हार्डवेअर हे इन्फ्रारेड सेन्सर, सोनिक सेन्सर, बझर व चाके असलेले आहे. यातील सॉफ्टवेअरमध्ये रुग्णाची सगळी माहिती नोंदवलेली असेल. यासोबतच त्या-त्या रुग्णाचे रोजचे प्रिस्क्रिप्शनही डॉक्टरांकडून अपलोड केलेले असेल तर रोबोटच्या कंपार्टमेंटमध्ये औषधी ठेवलेली असतील. दरम्यान, डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे त्या-त्या वेळेला हा रोबोट वॉर्डामध्ये जाईल व इन्फ्रारेडच्या साह्याने बेडवर लावलेला क्यूआरकाेड स्कॅन करून रुग्णाची ओळख पटवेल. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये डॉक्टरांनी अपलोड केलेल्या प्रिस्क्रिप्शनुसार औषधी काढून रुग्णास देईल. या वेळेस एक बझरही वाजेल, ज्यामुळे रुग्णालाही त्या औषधीची माहिती मिळेल.

रोबोटद्वारे औषधोपचार करण्याचे फायदे
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर म्हणून स्वच्छता कर्मचारी, पोलिस, शिक्षक मागील वर्षभरापासून जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णांवर औषधोपचार व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा रोबोट मोलाची कामगिरी बजावू शकतो. वॉर्डात रोबाेटच जाणार असल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना वारंवार रुग्णांजवळ जाण्याची गरज भासणार नाही.

डॉक्टर व रुग्णांशीही साधला संवाद
प्रत्यक्ष कोरोनाबाधितांवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या. यात कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेलेले आहेत, यामुळे रुग्णांवर उपचार करताना सुरुवातीला मनावर काहीसे दडपण असायचे, तसेच कुटुंबीयही चिंतीत असत. मात्र, रुग्णसेवा हेच कर्तव्य असल्यामुळे मोठ्या हिमतीने हे कोरोना वॉरियर्स लढत होते. याच कोरोना वॉरियर्सला मदत करण्यासाठी टीमने सलग सहा महिने अहोरात्र परिश्रम घेत उपयुक्त असा रोबोट तयार केला.

बातम्या आणखी आहेत...