आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुर्तिजापूर तालुक्यातील ग्रामनिंभा येथील शासकीय 85 एकर जमीनीपैकी एकूण 70 एकर जमीनीवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात प्रशासनाकडून काढण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून या जमीनीवर अतिक्रमण करण्यात आलेले होते. कारवाईदरम्यान, जिल्हाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. तर पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता.
कारवाईत यांचा समावेश
अतिक्रमण हटाव मोहीमेत उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार प्रदीप पवार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, नायब तहसीलदार बनसोड, विस्तार अधिकारी कीर्तने, मंडळ अधिकारी नागोलकर तसेच तलाठी व ग्रामसेवक या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. कडक पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले.
अतिक्रमीत जमीनीवर वृक्षारोपण उपक्रम
लवकरच या संपूर्ण शेत जमीनीवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुक्रवारी झाला. अतिक्रमण हटविल्यानंतर त्यांनी वृक्षारोपण केले. आज जवळपास 200 च्या वर वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आल्याचे सांगण्यात आली. यावेळी संबंधित सर्व अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांची उपस्थिती होती. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी देखील पुढाकार घेऊन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून वृक्ष लागवड मोहीम राबवावी जेणेकरून पर्यावरण संतुलनास हातभार लावता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले.
ग्राम दुर्गवाड्यात वृक्षदिंडी
तालुक्यातील ग्राम दुर्गवाडा येथे शुक्रवारी येथील शासकीय जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली. तत्पूर्वी संपूर्ण गावातून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. दुर्गवाडा येथे 125 एकर जमीन असून या ठिकाणी जवळपास 750 वृक्षांची लागवड केली जात असल्याची माहिती देण्यात आली. वृक्षदिडींत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.