आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे महापालिकेचे कामकाज कोलमडले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाच ते सहा तास वेळ मुलाखतीत जात आहे. त्यामुळे लेखा विभागासह काही विभागातील कर्मचाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत काम करावे लागत आहे.
फाईल्सचे ढिगारे
दररोज पाच ते सहा तास मुलाखतीत खर्च झाल्या नंतर उर्वरित तासात कर्मचारी पेडिंग कामे काढण्याचा प्रयत्न करतात. तसेच, मुलाखत घेता-घेता फाईल्सवर स्वाक्षऱ्याही केल्या जातात. अनेकदा रात्री आठ वाजेपर्यंत कामकाज सुरु ठेवतात. परंतु, सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत काम केल्यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. तरीही अनेक विभागातील टेबलवर फाईल्सचे ढिगारे पडलेले आहेत.
नेमका कार्यक्रम काय?
महापालिका प्रशासनाने सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरु आहे. विशेष म्हणजे यासाठी नियुक्त केलेल्या समितीत महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्याला मुलाखत देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विभागाबाबत माहिती नसताना प्रश्न विचारले जातात. एवढेच नव्हे तर अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी बीई, एमई, बीटेक, एमटेक झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचे हसू होत असताना आता कामकाजही रेंगाळले आहे. एकीकडे मुलाखत घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम खोळंबले असताना मुलाखत देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे त्या दिवशीचे कामकाज कोलमडते. त्यामुळे मुलाखत घेण्याचा हेतु चांगला असला तरी महापालिका सोडून अन्य विभागातील तज्ज्ञ अधिकारी अथवा सेवा निवृत्त अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करुन या मुलाखती घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे झाले नाही. परिणामी दररोज सुरु असलेल्या मुलाखतीमुळे महापालिकेचे पाच ते सहा तास खर्च होत आहेत. परिणामी मुलाखतीत बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्व कामकाज कोलमडले आहे. यामुळे नागरिकांची कामेही खोळंबली आहेत. नागरिकांना कामासाठी महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.