आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणी सोमवार:अकोल्यातील 700 वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची गर्दी; शिवशंभुचा जयघोष

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त अकोल्यातील आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात भक्तांची पहाटेपासून गर्दी सुरू झाली. कावड आणि पालखीने गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पाणी आणून भक्तांनी श्री राजेश्वराला अभिषेक घातला. हजारो शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून निघाला आहे.

कोरोना संकटाच्या काळानंतर यंदा प्रथमच या कावड यात्रेवरील निर्बंध उठविल्याने भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अकोल्याचा कावड-पालखी यात्रा महोत्सव हा राज्यात एकमेव असल्याने संपूर्ण विदर्भातील भक्तांना या यात्रेचे वेध लागतात. 2019 मध्ये शहरात कावड पालखी यात्रा महोत्सव उत्साहात साजरा झाला होता. शिवभक्तांच्या वतीने हजारो घागरी पाण्याचा राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला होता. मात्र दोन वर्षांपासून कोरोनामुळे कावड महोत्सवावर निर्बंध आले होते. या काळात फक्त राजराजेश्वर मंडळाच्या मानाच्या कावडीद्वारे शिवपिंडीला अभिषेक करण्यात आला. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असल्याने आदल्या दिवसापासून शिवभक्त उत्साहात होते. सोमवारी पहाटेपासून मंदीरात जलाभिषेकाला प्रारंभ झाला.

मंदीर परिसरात गर्दी, वाहनांना बंदी

शहराच्या कानाकोपऱ्यातून अबालवृद्ध भक्तांनी श्री राजराजेश्वर मंदीरात पूजा, अभिषेक आणि दर्शनाला गर्दी केल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे. हजारो भक्तांनी उपस्थिती लक्षात घेता दर्शन बारीचे नियोजन मंदिरात करण्यात आले आहे. या भागात होणारी गर्दी पाहता पोलिसांनी बॅरीगेट लाऊन मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश देण्यास बंदी केली आहे.

78 वर्षांची परंपरा

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदीरात श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथील कावड यात्रा महोत्वाची राज्यभरात ओळख असून महोत्सवाला तब्बल 78 वर्षांची परंपरा आहे. 1944 मध्ये अकोल्यामध्ये दुष्काळ पडला होता. या वेळी अकोलेकरांनी गांधीग्रामच्या पूर्णानदीच्या पाण्याने श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला. तेव्हापासून अकोल्यामध्ये कावड-पालखी महोत्सवाला सुरुवात झाली.

700 वर्षै पुरातन मंदीर

अकोल्यातील श्री राजराजेश्वराचे मंदिर हे सुमारे 700 वर्षे पूरातन असल्याचे सांगितले जाते. येथील शिवपिंड ही प्राचिन आणि खडकात कोरलेली आहे. भक्तांच्या अडचणीत त्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या श्री राजराजेश्वरावर भक्तांची अपार श्रद्धा आहे.

बातम्या आणखी आहेत...