आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगमनाची लगबग:गणरायाच्या आगमनाची लगबग; शहरातील बाजारपेठेत पसरले चैतन्य

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. अशात बाप्पाच्या स्वागतास अकोलेकर सज्ज झाले आहेत. गणेशाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग सुरु असून, सजावटीचे साहित्य, हार-नारळ, मिठाई खरेदीसाठी बाजारपेठ भाविकांनी गजबजली आहे. अकोला क्रिकेट क्लब येथे मूर्तिंचे दुकान लागायला सुरुवात झाली आहे.

गणेश मंडळाची तयारीही जोमात सुरु आहे. चौका-चौकात, जागो-जागी उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी लक्ष वेधून घेत असून, विद्युत रोषणाईने बाजारपेठा सजल्या आहे. हरतालिका असल्याने हरतालिका तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने बाजारपेठेत महिलांची गर्दी लक्षणीय आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. यंदा मात्र भाविकांचा प्रचंड उत्साह आहे. बाप्पांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. अकोल्याच्या बाजारपेठेत पेण, नगर, तसेच मातीच्या ग्रामीण भागांतून गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरातील गणेशभक्तांनी आतापासूनच आपल्या आवडीची गणेशमूर्ती आरक्षित करण्यास सुरूवात केली आहे.

मातीच्या मूर्तीना मागणी ः यंदा शाडू मातीच्या मूर्ती तसेच नेहमीच्या मूर्तीपेक्षा रंगबिरंगी खडे, डायमंड वर्क केलेल्या मूर्तीलादेखील गणेशभक्तांकडून विशेष मागणी होऊ लागली आहे. विविध रंगांतील खडे, बाजूबंद, मुकुट, सोंडपट्टी आदी आभूषणांची आकर्षक सजावट गणेशमूर्तीवर करण्यात आली आहे. घरगुती गणपती मूर्तीसह सार्वजनिक मंडळांसाठी लागणाऱ्या मोठ्या आकारातील गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रेखीव डोळे, मूर्तीवरील इतर कोरीव काम असलेल्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा विशेष कल दिसून येतो.

सजावटींच्या साहित्यांमध्ये नवनवीन प्रकार ः गणपतीमूर्तीप्रमाणे सजावटीचे साहित्यांची दुकाने सजली आहेत. सध्या प्लॅस्टिक व थर्मोकोलवर बंदी असल्याने थर्मोकोलची मखरे बाजारपेठेतून गायब झाली असून, त्याची जागा कागदी, पुठ्ठ्याच्या इको फ्रेंडली मखरांनी घेतली आहे.

सजावटीच्या साहित्यांनी दुकाने आकर्षक दिसत असल्याने भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदा साजावटिच्या साहित्यांमध्ये बाजारात विविध नवीन प्रकार बघावयास मिळतात. यात पारंपारिक सजावटीच्या प्रकारातील रेडीमेड प्रकार खास आहेत.

बातम्या आणखी आहेत...