आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर-कारंजा दरम्यान झाडांच्या बुंद्याला आग लावून सर्रास झाडांची कत्तल करण्यात येत आहे. अनैसर्गिकरित्या झाड वाळवायचे किंवा झाडाच्या बुंध्यामध्ये आग लावून झाड खाली कोसळले की, त्याची विल्हेवाट लावायची असा प्रकार इथे बेधडक सुरू आहे.
निसर्गाची हानी
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असा आर्जव करायचा व वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे सांगायचे. परंतु, दुसरीकडे तालुक्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची बेमालूमपणे विल्हेवाट लावण्याचा प्रकार मन सुन्न करणारा आहे. ही झाडे कोणत्याही भीतीविना कत्तल करून विल्हेवाट लावण्याचा सपाटा कोणाच्या अभयदानातून सुरू आहे ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहे. तर याकडे तातडीने संबंधित विभागाचे अधिकारी, प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील, अशी अपेक्षा वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत.
वृक्षारोपणाचा खर्च व्यर्थ
भरमसाठ वृक्षतोडीमुळे निसर्गात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून वादळे, अवकाळी पाऊस, उष्णतेत वाढ, अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशाप्रकारे पर्यावरणाचा समतोल ढासळलेला दिसून येतो आहे. त्याकरिता दरवर्षी कोट्यावधी रुपये झाडे लावण्यावर खर्च केली जात असताना दुसरीकडे मोलाच्या झाडांची वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन विल्हेवाट लावण्याचा प्रकार निंदनीय आहे.
प्रवाशांच्या जीवाला धोका
या मार्गावर झाडाच्या बुंध्यातून जळालेली अनेक वृक्ष आणि नैसर्गिकरित्या वाळवलेली वृक्ष मोठ्या संख्येने उभी आहेत. येणाऱ्या काळात वारा, वादळ आणि पाऊस यामुळे ही झाडे कधी आणि कोणाच्या अंगावर किंवा वाहनांवर कोसळतील याचा नेम नाही.
या झाडांची झाली कत्तल
या मार्गावरील झाड क्र. 11, 12, 16,20, 98, 119, 128, 140, 178, 185, 187, 511, 574, 570, 584, 597 या क्रमांकाची झाड मागील काही दिवसांमध्ये आगी लावून जाळलेला दिसून येते आहेत. हा अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.