आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावरील माल धक्का सुरू होणार:रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक यांचे आदेश; कामगारांना दिलासा, व्यापाऱ्यांच्या मागणीला यश

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील रेल्वे स्थानकावरील मालधक्का सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक यांनी याबाबत आदेश जाहीर केले आहे. या निर्णयाचे व्यापारी व तेथे काम करणारे कामगार, कंत्राटदार यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

शिवणी येथे स्थानांतरण

अकोला रेल्वे स्थानक परिसरातील मालधक्क्यामुळे शहरात अवजडवाहतूक होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत होती. सिंधी कॅम्प चौक ते थेट रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावर शाळकरी विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता, संभाव्य अपघात टाळण्याच्या उद्देशातून तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी 2017 मध्ये मालधक्का शिवनी परिसरात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या शहरामध्ये उड्डाणपूलाचे बांधकाम झाले आहे. यामुळे यावेळी वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता कमी आहे.

शेड नसल्यामुळे अडचण

शिवनी येथे प्रशस्त शेड व व्यवस्था नसल्याने विविध प्रकारच्या साहित्याची व मालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याचे प्रमाण वाढले होते. मागील पावसामध्ये करोडे रूपयाचा युरिया पावसामध्ये भिजला होतो. तसेच काही दिवसांपूर्वी मालगाडीतून उतरवण्यात आलेले सिमेंट लगेच आलेल्या पावसामुळे भिजून खराब झाले होते. धक्क्यावर शेड नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे शहरातील रेल्वे स्थानकालगतचा मालधक्का सुरू व्हावा, अशी मागणी केली जात होती.

मागणीची घेतली दखल

भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. हा धक्का सुरू करणे अत्यावश्यक असल्याची बाब त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर हा मालधक्का सुरू करण्याचा आदेश रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक शीलभद्र गौतम यांनी दिले. या मालधक्क्यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया मालधक्का कंत्राटदार अय्युब भाई, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मजहर खान यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...