आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुईसपाट:दुकानांचे वरचे शेड, पार्किंगमध्ये अडथळा ठरणारे ओटे भुईसपाट

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी मुख्य पोस्ट ऑफिस ते सुधीर कॉलनी मार्गावरील वाहतुकीस तसेच पार्किंगमध्ये अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले. यात दुकानांचे शेड तसेच ओट्यांचा समावेश होता. तसेच काही चारचाकी गाड्याही अतिक्रमण हटाव पथकाने जप्त केल्या.

शहराच्या सर्वच मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकीकडे विविध मार्गावर लघु व्यावसायिक आपली दुकाने थाटतात अथवा चारचाकी गाड्या लावून व्यवसाय करतात, तर दुसरीकडे व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर ओटे बांधले आहेत. या ओट्यांमुळे आलेल्या ग्राहकाला आपली गाडी दुकानासमोर पार्क करता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आपली दुचाकी रस्त्यावर उभी करावी लागते.

या प्रकारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्या नंतरही रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतूने शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून सुरू केली. गुरुवारी मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन चौक-सिव्हिल लाईन चौक ते जवाहर नगर चौक ते सुधीर कॉलनीपर्यंत ही मोहीम राबवली. यात ३० दुकानांचे बाहेर आलेले शेड तोडले, तर पार्किंगमध्ये अडथळा ठरलेले ३५ दुकांनासमोरील ओटे भूईसपाट केले. ही मोहीम पूर्व झोनचे अधिकारी विजय पारतवार, सुनील इंगळे, प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रूपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उप‌र्वट, कविता सगडे यांनी राबवली.

आज नेहरू पार्क ते बिर्ला चौक मार्गावर राबवणार मोहीम अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी नेहरू पार्क चौक-सिव्हिल लाईन चौक-रतनलाल प्लॉट चौक-दुर्गा चौक ते बिर्ला चौक या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...