आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारस दुर्घटना:शिंदेंकडून 4 , तर महाजनांकडून 5  लाखांची मदत, मंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाइकांची चौकशी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला, तर २६ भाविक जखमी झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ४ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. रुग्णालयात भेट देणारे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, शिंदे आणि महाजन यांच्या वेगवेगळ्या मदतीच्या घोषणेमुळे नेमकी मदत किती याबाबत संभ्रम निर्माण झाला असून सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वोपचार रुग्णालयात भेट देत जखमी भाविकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जखमींशी संवाद साधला व शासकीय खर्चाने उपचार केले जातील असे सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतही महाजन यांनी जाहीर केली. तसेच जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वोपचार रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

एका भाविकाने केली अमरावतीत उपचाराची मागणी
या वेळी अमरावती येथील एका भाविकाने आपल्याला अमरावती येथे वैद्यकीय उपचारासाठी रेफर करण्यात यावे, अशी मागणी केली असता अब्दुल सत्तार यांनी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उपचार देण्यात येतील, असे सांगत डॉक्टरांना सूचना केल्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्यासह सेना, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.