आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एबी पॉझिटिव्ह:रुग्ण एकच : आधी दिले ए पॉझिटिव्ह रक्त, नंतर सांगितले एबी पॉझिटिव्ह

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या महिला रुग्णाला ५ जुलैला ए पॉझिटीव्ह गटाचे रक्त चढवण्यात आले. त्याच महिलेला २५ ऑगस्टला एबी पॉझिटीव्ह गटाचे रक्त द्यावे लागणार असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगतलेे. हा प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात समोर आल्याचे सांगत नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान महिनाभरात रक्तगट बदलला कसा, अशी शंका नातेवाइकांना आल्याने पुढील अनर्थ टळला.

सिटी कोतवाली ठाण्यात, वनमाला राहूल गवारगुरु (रा. पंचगव्हाण, ता. तेल्हारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की माझी आई चंद्रकला रमेश बोदडे यांना ५/७/२०२२ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताची कमतरता अर्थात अॅनिमिया असे निदान केले व आम्हाला ए प्लस ग्रुपच्या रक्तासाठी डोनर आणावयास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही ए प्लस ग्रुपचे रक्त आणून डॉक्टरांजवळ दिले. त्यांनी ते रक्त माझ्या आईला दिले. पुन्हा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आईला सर्वोपचार येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अॅनिमियाचे निदान केले व या वेळी एबी प्लस ग्रुपच्या रक्तासाठी डोनर आणावयास सांगितले.

या वेळी एबी प्लस ग्रुपचे रक्त कसे सांगितले ? याबाबत आम्ही विचारणा केली असता रक्त तपासणीमध्ये कचरा आल्याने ब्लड ग्रुप बदललेला आहे, असे बेजबाबदार उत्तर दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे माझ्या आईला देण्यासाठी दोन वेळा वेगवेगळ्या गटाचे रक्त आम्हास आणावयाचे सांगितले, यावरून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर हे माझ्या आईच्या जीवाशी व इतर रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत असून, डॉक्टरांवर योग्य चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून इतर रुग्णांच्या जीवाशी यापुढे कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची प्रतिलिपी अधिष्ठातांना देण्यात आली आहे. दरम्यान याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...