आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Possible Return Of Money For The Stalled Water Tank Work, Despite The Commencement Order, The Water Tank Work Is Still Not Started Due To Opposition

रखडलेल्या जलकुंभाच्या कामाचे पैसे परत जाण्याची शक्यता:कार्यारंभ आदेश देऊनही विरोधामुळे जलकुंभाचे काम अद्याप सुरू नाही

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजनेअंतर्गत डाबकी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाचे आदेश देण्यात आले. मात्र, या कामास पुन्हा विरोध झाला. त्यामुळे काम थांबविण्यात आले. या जलकुंभाच्या बांधकामासाठी नव्या जागेचा शोधही घेण्यात आला नाही. त्यामुळे या जलकुंभाच्या कामाचे पैसे परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणाचे काम सुरु करण्यात आले. यात शहरात (मुळ हद्द) आठ नविन जलकुंभाचे बांधकाम केल्या जाणार होते. यापैकी सात जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातून पाणी पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. तर जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात एक 18 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार होता. मात्र, या जलकुंभाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे या जलकुंभाचे काम रखडले होते.

कंत्राटदाराने काम सुरु करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली. यासाठी महापालिकेने सात लाख रुपयाचा भरणा पोलिस प्रशासनाकडे केला. मात्र विविध कारणांनी बंदोबस्त न मिळाल्याने जलकुंभाचे काम सुरु झाले नाही. दरम्यान तीन वर्ष लोटल्यामुळे महापालिकेने अमृत योजनेच्या तांत्रिक समितीकडे पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यासाठी मंजुरी मागीतली. मंजुरी मिळाल्यानंतर जलकुंभाच्या कामाच्या पुन्हा निविदा बोलावण्यात आल्या.

जलकुंभाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी पोलिस संरक्षणही पुरविण्यात आले. मात्र, पुन्हा परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याने प्रशासनाने काम बंद केले. कंत्राटदाराला दिलेले कामाचे आदेश अद्याप प्रशासनाने रद्द केले नाही तसेच कामही सुरू केले नाही. त्यामुळे 2.50 कोटी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

जागाच नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदाना समोर महापालिकेची बंद पडलेली शाळा आहे. या शाळा परिसरात जलकुंभाचे बांधकाम करता येवू शकते. मात्र शाळे लगतच ११ केव्ही उपकेंद्र आहे. त्यामुळे येथे जलकुंभ बांधणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे ही जागा वापरता येणार नाही. डिपीआर नुसार हा जलकुंभ बांधण्यात येणार होता. त्यामुळे अन्य ठिकाणी या जलकुंभाचे काम करता येत नाही.

कामाचे आदेश रद्द नाहीत

अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एका जलकुंभाचे काम रखडलेले आहे. वादामुळे हे काम रखडले असून दिलेल्या कामाचे आदेशही रद्द केलेले नाही. मात्र, निधी परत गेल्यास अमृतच्या दुसऱ्या टप्प्यात या जलकुंभाचे काम करता येणार आहे.

- हरिदास ताठे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा

बातम्या आणखी आहेत...