आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाला स्थगिती:जीएमसीत प्राध्यापकांच्या आंदोलनाला दिली स्थगिती ; महिनाभरात प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करू

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाला एका महिन्याची स्थगिती देण्यात आली आहे. एनपीए तसेच विविध भत्ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे, अस्थायी सहायक प्राध्यापकांचा शासकीय सेवेत समावेश करावा, कंत्राटी नियुक्तीचा २७ जानेवारी २०२२ च्या कॅबीनेट बैठकीतील शासन निर्देश रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यांपासून हे आंदोलन सुरू होते.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनात प्राध्यापक डॉक्टरांनी प्रशासकीय, शैक्षणिक कामकाज व इतर रुग्णसेवेवरही बहिष्कार टाकला होता. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्राद्वारे मागण्या कळवण्यात आल्या. राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने १५ मार्चला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली होती. अस्थायी सहायक प्राध्यापकांना स्थायी करण्यासंदर्भात मार्ग काढण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान देण्यात आले होते.

प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करुन एक महिन्यात मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व रुग्णसेवा लक्षात घेता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मंत्री देशमुख यांनी केले. त्यानुसार एका महिन्यासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, महिनाभरात प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...