आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:शिवभक्तांनी मांडल्या समस्या; अतिक्रमण हटवणार, सुविधा देण्याची प्रशासनाची ग्वाही

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावड- पालखी उत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात झाली. मंडळांनी उत्सवाबाबत मिरवणूक मार्गासह अन्य समस्या मांडल्या. यावर पालखी मार्गावरील अतिक्रमणे व अन्य दुकाने हटवण्यासाठी मनपासाेबत पोलिस प्रशासन संयुक्त कारवाई करेल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी नीमा अरोरा,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार,उपविभागीय पोलिस अधिकारी राऊत, दुधगावकर तसेच पालखी उत्सव मंडळांचे राजेश भारती, हभप तुळशीदास मसने महाराज, चंदू सावजी, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उत्सव शांततेत, उत्साहात होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले की, उत्सव साजरा करण्यास कोणतीही बंदी नसली तरी त्यासाठी आवश्यक परवानगी स्थानिक पोलिस स्टेशन मधून घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक असेल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

प्रशासन सुविधांची पूर्तता करेल :राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्याच्या परंपरेचा भाग म्हणून साजरा होणारा कावड पालखी सोहळा उत्साहात व्हावा, यासाठी प्रशासन भक्तांना आवश्यक सुविधांची पूर्तता करेल; तर उत्सव शांततेत व्हावा, यासाठी कावड पालखी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.

परवानगी घेणे आवश्यकच :उत्सव शांततेत हाेण्यासाठी पोलिस दल सज्जअसल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले. लाऊड स्पिकर आदींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असून, सकाळी सहा ते रात्री दहा या वेळात लाऊड स्पिकर वापरण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमधून परवानगी घेणे आवश्यक आहे.
बंदी कशालाही नसली तरी पूर्वपरवानगी व नियमांचे पालन आवश्यक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणवेश वा समान टि शर्ट परिधान केल्यास पोलिस प्रशासनास मदत होईल, असे सांगितले. पालखी मार्गावरील अतिक्रमणे व अन्य दुकाने हटवण्यासाठी मनपा सोबत पोलिस प्रशासन संयुक्त कारवाई करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या सुविधांसाठी प्रयत्न :कावड-पालखी मार्गावरील रस्ते, लाइट, रुग्ण्वाहिका,बचाव पथके अन्य सुरक्षा व्यवस्था आदी सुविधा अधिकाधिक देण्यासाठी प्रशासन संबंधित विभागांचे सहकार्य घेऊन प्रयत्न करत आहे. शेवटच्या श्रावणी सोमवार पर्यंत जास्तीत जास्त सुविधा देऊन पालखी कावड उत्सव उत्साहात साजरा व्हावा असेच प्रशासनाचे नियोजन असेल. तसेच मंडळांनीही प्रशासनाला उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

मंडळांच्या मागण्या अशा
बैठकीत मंडळांतर्फे राजेश भारती, हभप तुळशीदास मसने महाराज, गोपाल नागापुरे, विठ्ठल गाडे, पप्पू वानखडे, पप्पू मोरवाल, हिरामण कुंभारे आदींनी मनोगत व्यक्त करुन भूमिका मांडली. पालखी कावड मार्गाची दुरुस्ती, पूर्णा नदी पात्रात सुरक्षा व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, बचाव पथक, रुग्णवाहिका,वैद्यकीय पथक, पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवणे, राजराजेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचे नियंत्रण याबाबत मागण्या मांडल्या.

बातम्या आणखी आहेत...