आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात श्रावण सोमवारनिमित्त कावड यात्रा:शंकर संस्थान गायगावतर्फे मिरवणूक; शिवमंदिरात पाण्याने केला शिवलिंगाला अभिषेक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर तालुक्यातील श्री शंकर संस्थान गायगाव च्यावतीने श्रावण सोमवारनिमित्त 15 ऑगस्टला गावातून कावड यात्रा मिरवणूक काढण्यात आली. गायगावसह परिसरातील युवकांनी या कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेत श्री क्षेत्र नागझरी येथून कावडीद्वारे पाणी आणले व गायगाव येथील शिवमंदिरात जलाभिषेक घातला.

अकोलेकरांचा कावड यात्रेला उत्साह

दरवर्षीच्या श्रावण मासातील कावड यात्रा उत्सव अकोलेकरांचा लोकोत्सव म्हणून नावारूपास आलेला आहे. दरवर्षी हजारो युवक हा महोत्सवात सहभागी होतात. ‘हरऽऽऽ बोला महादेव’च्या गजरात कावड यात्रा आदल्या दिवशी पाणी आणण्यासाठी पूर्णा नदीच्या दिशेने निघतात. पात्रातून कावडद्वारे आणलेल्या पाण्याने सोमवारी श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात येतो. हा उत्सव अकोला शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो.

वाजत गाजत काढली मिरवणूक

गावागावात कावड यात्रा उत्सव मंडळ कार्यरत असून श्रावणात या मंडळांमध्ये उत्साह संचारतो. गायगाव येथील श्री शंकर संस्थानच्या वतीनेही गेल्या काही वर्षांपासून हा महोत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह आहे. दरम्यान रविवारी रात्री गावातील शिवभक्तांनी निमकर्दा, आडोशी-कडोशी, कसूरामार्गे नागझरी येथे कावड यात्रा नेली. श्री क्षेत्र गोमाजी महाराज संस्थान मंदिरातील गोमुखातून एकवीस भरणे जल घेऊन कावड सोमवारी सकाळी गायगावात दाखल झाली. गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जलाभिषेक करण्यात आला.

सकाळी मिरवणूक

रविवारी रात्री भर पावसात श्री शंकर संस्थान गायगाव येथून शिवभक्त कावड घेऊन श्री क्षेत्र नागझरीला पायी निघाले. सोमवारी पहाटे वाजत गाजत कावड गावात दाखल झाली. गावात चौकाचौकात महिलांनी कावड पूजन केले. डफडे आणि ताशाच्या तालावर थिरकत तरुणाईने या उत्सवाचा आनंद घेतला. श्रावण सोमवारनिमित्त गावातील श्री शंकर संस्थान मंदिरात पूजा आणि दर्शनासाठी भक्तांची वर्दळ होती.

श्रीगणेश मंदिरात गर्दी

गायगाव निमकर्दा मार्गावर असलेल्या श्रीगणेश मंदिरात चतुर्थीनिमित्त सोमवारी भाविकांची वर्दळ होती. संपूर्ण जिल्ह्यात परिचित प्रसिध्द असलेल्या या मंदिरात चतुर्थी रोजी जिल्ह्यातील विविध भागातून भक्त दर्शनासाठी येतात.

बातम्या आणखी आहेत...