आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंतेत वाढ:जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस; मुगाचे नुकसान

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या विविध भागात रविवार, ११ सप्टेंबरला सायंकाळनंतर वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक भागात काढणीला आलेल्या मुगाचे नुकसान झाले.शनिवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले. बोरगाव मंजू परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली होती. रविवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रात्री पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे उदीड-मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून ते ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्येही वादळी पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना तडाखा बसला आहे.

बाळापूर तालुक्यात पिकांना पुन्हा फटका
बाळापूर तालुक्यात शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे मुगासह अन्य पिकांना फटका बसला आहे. कवठा, निंबा, लोहारा, हातरूण, निमकर्दा, दुधाळा, मंडळा, मालवाडा, लोणाग्रा, हातला, शिंगोली आदी भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडले. पाणी साचल्याने आता काही दिवस कामासाठी शेतात जाणेही शक्य नाही. आधीच जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे बाळापूर तालुक्यात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. आताही शेतीचे नुकसान होणे सुरूच आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुढील दोन दिवस पाऊस
पुढील दोन दिवस म्हणजे १२ व १३ सप्टेंबरला विदर्भात गडगडाटासह सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ व १५ सप्टेंबर तसेच १८ व २० सप्टेंबर या कालावधीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हायवेवरील झाडे पडली
१० सप्टेंबरला सायंकाळच्या दरम्यान बोरगाव मंजू परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात अजमेरा जिनिंग अॅग्रोचे छत पडले. राष्ट्रीय महामार्गावरील झाडे कोसळली. परिसरात घराची मोठ्या प्रमाणात पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...