आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रखर उन्हाचे चटके सोसणाऱ्या अकोला जिल्ह्याला पावसामुळे दिलासा मिळाला आहे. गुरुवारी, 9 जूनला रात्री अकरानंतर जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वारा, विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह मध्यरात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान आज 10 जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विशेष करून बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा हवामानतज्ञांचा अंदाज आहे
जून महिन्याच्या सुरुवातीलाच अकोला जिल्ह्याने कमाल तापमानाचा 44 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडल्याने अकोलेकर उकाड्यामुळे हैराण झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह खरीप पेरणीची तयारी करून सज्ज असलेल्या बळीराजाला मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अशात मान्सूनपूर्व आनंद सरी बरसल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शुक्रवारीही सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान पुढील सात दिवस विविध भागात पावसाची शक्यता. सध्याचा पाऊस हा मान्सूनपूर्व असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अनेक शेतकरी दरवर्षी अल्प पावसावर पेरणीचा निर्णय घेतात. जमिनीची पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करणे आर्थिक नुकसानीचे ठरू शकते, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
अकोला तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र दिलासादायक वातावरण तयार झाले आहे. या पावसाची जिल्ह्यातील सरासरी 3.4 मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. अकोला तालुक्यात सर्वाधिक6.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान 11 आणि 12 जून राेजी सलग दोन दिवस अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 17 जूनपर्यंत विदर्भातील विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.