आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Ration Card Complaint Free Village Campaign To Be Implemented; Tehsildar Will Hold A Meeting Of Fair Price Shopkeepers |marathi News

दिव्य मराठी विशेष:रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव अभियान राबवणार; तहसीलदार घेणार रास्तभाव दुकानदारांची बैठक

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण व शहरी भागात रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव अभियान राबवण्यात येणार असून, अभियानादरम्यान शिधापत्रिकेबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. हे अभियान सोमवार ११ ते शनिवार ३० एप्रिल दरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत संबंधित तहसीलदार हे रास्तभाव दुकानदरांची बैठक घेणार आहेत.

ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना रेशनकार्डसंबंधी कामासाठी प्रत्येक वेळी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यात वेळ व पैशाचाही अपव्यय होतो, हे टाळण्यासाठी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अभियान राबवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेश जारी केला असून, साेमवार ११ ते शनिवार ३० एप्रिल दरम्यान विशेष मोहिम राबवून रेशनकार्ड संदर्भातील सर्व कामे त्या भागातील रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहे.

रेशनकार्ड तक्रार मुक्त गाव मोहिम राबवण्याकरता तहसीलदार रास्तभाव दुकानदार याची बैठक घेणार आहेत. रास्तभाव दुकानदार यांना अभियानाबाबत कार्यपद्धती व्यवस्थितपणे समजावून सांगून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अभियानामध्ये जे गाव रेशनकार्ड तक्रारमुक्त होईल त्या गावच्या रास्त धान्य दुकानदारांना पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट काम केल्याबाबत पारितोषिक देण्यात येईल.

नाव कमी-जास्त होणार
शिधापत्रिकेतील किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी रास्तभाव दुकानदार कार्डधारकांकडून अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला अथवा जन्म नाेंदीचा दाखला, कुटूंबातील सर्वांच्या आधार कार्डची छायांकीत प्रत याप्रमाणे कागदपत्रे प्राप्त करणार आहे. त्यानंतर सर्व कार्डधारकांची यादी करुन तहसील कार्यालयात जमा हाेणार आहे. दुरुस्त झालेले रेशनकार्ड तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या समक्ष नागरिकांना वितरीत करण्यात येणार आहे.

असे राबवण्यात येणार अभियान
सर्व रास्तभाव दुकानदार आपल्या क्षेत्रातील रेशनकार्ड फाटलेले, जीर्ण अथवा हरवलेले आहे, अशा कार्डधारकांची यादी तयार करणार आहेत. सर्व कार्डधारकांचे प्रमाणपत्र तयार करण्यात येणार आहेत. तसेच कार्यालयाकडून पुरवण्यात आलेला एक पानी अर्ज कार्डधारकाकडून भरुन घेण्यात येणार आहे. रेशनकार्डकरीता शासकीय शुल्क घेण्यात येईल. त्यानंतर रेशनकार्डचे तलाठी-ग्रामसेवकांच्या समक्ष वाटप होईल.

अधिकाऱ्यांवर राहणार पूर्ण जबाबदारी
रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव अभियानाच्या कालावधीत मोठया संख्येने अर्ज येण्याची शक्यता लक्षात तहसील कार्यालयात नियोजन करणार आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांना कामे वाटून देण्यात येणार आहेत. मोहिमेतील अर्जाचा निपटारा करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता सर्व तहसीलदार व निरीक्षण अधिकारी यांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाद्वारे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...