आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पर्यावरणदिन:जगात उष्ण शहर म्हणून नोंद; जिल्ह्यात 7 टक्केच वनक्षेत्र शिल्लक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जंगलातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील वनक्षेत्रात सुमारे दोन ते तीन टक्क्यांनी घट होऊन अवघे सात टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. त्यामुळेच अकोल्याची वाटचाल ही वाळवंटाकडे होत आहे. जिल्ह्याच्या नैसर्गिक आरोग्यासाठी भौगोलिक क्षेत्रानुसार वनक्षेत्रच शिल्लक नसल्याने अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमधील एक आहे. परिणामी येथील वन्यजीव आणि शेतीही धोक्यात येत आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा, नरनाळा, पातूर, आलेगाव, बार्शीटाकळी इतर तालुक्यांतील वनपरिक्षेत्र आहे. ही वने उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी आहेत. गेल्या काही वर्षांपासून वनांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढीने जंगल क्षेत्र घटत आहे. परिणामी तापमान, प्रदूषण वाढीसह अतिवृष्टी व अवर्षणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम वन्यजीव, पर्यावरण, शेतीवर दिसत आहे. वनक्षेत्र वाढीसाठी वनविभागाद्वारे वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवले जात असले तरी वनक्षेत्रात सुरक्षा देण्यात ही यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.

गरज ३३ टक्के, वास्तवात ७ टक्के
राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीनुसार प्रत्येक राज्याचे वनक्षेत्र हे एकूण भूभागाच्या तुलनेत ३३ टक्के असणे बंधनकारक आहे. मात्र, महाराष्ट्रात केवळ १९.४३ टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. अकोला जिल्ह्याचा विचार केल्यास ७ टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. त्यातही वृक्षांनी आच्छादित प्रदेश किंवा ग्रीन कव्हर एरिया घटला आहे.

थेट परिणाम : अकोला जगात उष्ण
स्थानिक पर्यावरण अभ्यासक, वनविभागातील अधिकाऱ्यांच्या मते अकोला शहर हे जगातील सर्वाधिक उष्ण असण्यामागे घटलेले वनक्षेत्र हे महत्त्वाचे कारण आहे. जंगल वेगाने कमी झाल्याने कार्बन वायू शोषून घेण्याची व्यवस्था नष्ट होत आहे. त्यामुळे तापमान वाढीचे संकट निर्माण झाले आहे.

लोकसहभागातून वाढेल हरित क्षेत्र
जिल्ह्यातील घटलेले वनक्षेत्रही वाढत्या तणांमुळे धोक्यात आले आहे. हरित क्षेत्र वाढवण्यासाठी केवळ वनक्षेत्रावर अवलंबून न राहता शासनाच्या व इतर जमिनींवर, शेतांच्या बांधांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लोकसहभाग मिळणे आवश्यक आहे.
सु. अ. वडोदे, सहायक वनसंरक्षक

जमिनीच्या पाणी साठवण क्षमतेत घट
वनक्षेत्रासह झुडपांचे जंगल, गवताळ प्रदेश कमी झाला. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण क्षमता घटली, परिणामी भूजल पातळी खोलवर गेली. वन्यप्राण्यांना नैसर्गिक चारा, जंगलात सुरक्षित जागा नसल्याने प्राणी शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान व मानव वन्यजीव संघर्ष वाढला . अमोल सावंत, पर्यावरण अभ्यासक.

बातम्या आणखी आहेत...