आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुतांश आजारांमध्ये माणसाच्या डोळ्यांतील रेटिनावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. शिवाय वयोमानानुसार रेटिना (डोळ्यातील मागचा पडदा) कमकुवत होतो. अशा वेळी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होण्यास साधारणपणे ४०-४५ दिवस लागतात. परंतु, आता रेटिना शस्त्रक्रिया रिकव्हरी ३-४ दिवसांत शक्य होणार आहे. अकोल्यातील डॉ. सुनील भड यांनी या शस्त्रक्रियेसंबंधी क्रांतिकारी तंत्र विकसित केले आहे. याला केंद्र सरकारचे पेटंटही मिळाले आहे.
काय आहे संशोधन? : कॉनिर्या अर्थात काळे बुबुळ, पृष्ठभागावरील पांढरा पडदा, विट्रेरस हुमर(डोळ्याच्या आतील जेल), रेटिना म्हणजे आतील पडदा अशी डोळ्यांची क्लिष्ट रचना असते. डोळ्याच्या पृष्ठभागावरील पांढऱ्या पडद्यामध्ये दोन लेअर असतात, पहिल्या लेअरला कंन्जटिव्हा (conjunctiva), जी डोळ्याच्या दर्शनी भागानंतर थोडी आतपर्यंत असते. तर दुसरीला स्क्लेरा (sclera)म्हणतात. ही लेअर डोळ्याला संपूर्ण गोलाकार सुरक्षा भिंतीसारखी असते. अंदाजे २४ मिलिमीटर तिचा परीघ असतो. शस्त्रक्रिया करताना बुबुळाला(cornea) हात लावला जात नाही.
डोळ्याच्या रेटिना शस्त्रक्रियेनंतर आता रिकव्हरी ४५ ऐवजी अवघ्या तीन दिवसांत शक्य
बुबुळांच्या सभोवताली पांढऱ्या लेअरला आवश्यकतेनुसार तीन-चार चिरे मारून ०.६ मिलिमीटर आकाराची अवजारे आत टाकले जातात. डोळ्याच्या आत असणारे जेल नळीने काढले जाते. मागचा पडदा फाटल्यामुळे डोळ्यात इतरत्र पसरलेले पाणी नळीने ओढले जाते. त्यामुळे रेटिना अर्थात मागचा पडदा पुन्हा मूळ जागेवर येतो. त्यानंतर फाटलेला पडदा लेझर, सिलिकॉन ऑइल किंवा गॅसच्या आधारे दाब देवून चिकटवला जातो. शस्त्रक्रिया येथे पूर्ण होते. अवजार कंन्जटिव्हा आणि स्लेरामधून बाहेर पडतात. यावेळी दोन्ही लेअरला पडलेल्या चिऱ्यांना शिवण्यात येते. रुग्णांची मुख्य समस्या इथून सुरू होते. डॉ. भड यांच्या संशोधनामुळे कंन्जटिव्हाला चिरा न मारता सरकवला जाईल. यामुळे डोळ्याच्या पृष्ठभागावर शस्त्रक्रियेची जखम दिसणार नाही. या संशोधनासाठी डॉ. भड यांना सरस्वती ट्युशन क्लासचे डॉ. प्रशांत देशमुख यांचे पाठबळ लाभले.
शस्त्रक्रियेचा कालावधी कमी होणार : या संशोधनातील यंत्र स्वत: टाके देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे मानवी चूका कमी होतील. तसेच ३० सेकंदात एक टाका लावला जाईल. यामुळे रेटिना शस्त्रक्रियेचा कालावधी कमी होईल.
हे त्रास होणार नाहीत : पृष्ठभागावर टाके देताना होणारा रक्तस्त्राव टळेल, डोळा लाल व सुजणार नाही, शस्त्रक्रियेनंतचा शुष्कपणा, मास येण्याची समस्या नसेल, चष्म्याचा नंबर सतत बदलणार नाही, भविष्यात काचबिंदूची शस्त्रक्रिया शक्य होईल.
अशी आहे नवीन पद्धत : पारंपारिक पद्धतीमध्ये कंन्जटिव्हा आणि स्क्लेरामधून अवजार आत टाकून रेटिना शस्त्रक्रिया केली जाते. डॉ. भड यांचे यंत्र पेनाएवढा आकार व २० ग्राम वजनाचे आहे. या यंत्राद्वारे कंन्जटिव्हा बाजूला सरकवला जातो व स्क्लेराचा चिरा मारून अवजार आत जाईल. मुख्य शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्लेराला शिवले जाईल. तर कंन्जटिव्हा सरकवून पुन्हा जागेवर ठेवला जाईल. स्ल्केराच्या टाक्यांवर नैसर्गिक कंन्जटिव्हाचा पडदा पडेल. त्यामुळे आतील जखम त्वरित भरून येईल. पारंपरिक पद्धतीमध्ये नाजूक डोळ्यांच्या पृष्ठभागावर टाके मारले जातात. यामुळे जवळ
रुग्ण आणि डॉक्टर या दोघांसाठी फायद्याचे ठरेल नवे संशोधित तंत्र
या संशोधित यंत्रामुळे सर्जन आणि रुग्ण दोघांनाही आगामी काळात चांगला फायदा होणार आहे. सर्वसाधारणपणे रेटिनाच्या शस्त्रक्रियेनंतर घेतलेले टाके विरघरळण्यासाठी ४०-४५ दिवस लागतात. या काळात रुग्णांना डोळे लाल होणे, पाणी येणे, खाज अशा समस्या होतात. या यंत्रामुळे कंन्जटिव्हा टाके नसतील. रुग्णांना त्रास होणार नाही. तसेच टाके घेण्याचे काम यंत्र करणार असल्याने वेळ वाचेल. डॉ. प्रमोद देवसरकर, एमएस (नेत्रचिकित्सा)
दोन वर्षांच्या संशोधनानंतर यश, अनेक रुग्णांसाठी ठरेल वरदान
दोन वर्षांच्या संशोधनानंतर ही पद्धत व यंत्र विकसित केले. रक्तदाब, मधुमेह, इन्फेक्शन, मोतीबिंदू, लहानपणापासून ऑक्सिजन समस्या असणारे रुग्ण, ह्रदयरोग, दुर्धर आजार, किडनी समस्या आदी रुग्णांना रेटिना खराब होण्याची सर्वाधिक समस्या असते. अशा रुग्णांसाठी हे संशोधन वरदान ठरेल. - डॉ. सुनील भड, एमबीबीएस, एमएस, एफव्हीआरएस(रेटिना) झोडगा, ता. बार्शीटाकळी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.