आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवार्ता:निर्बंध हटले; दाेन वर्ष मूर्तिकामात गुंतलेले सहा काेटी माेकळे झाले! ; व्यवसायावरचे विघ्न सरले

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने काेराेना संसर्गाच्या काळात लावलेले निर्बंध हटवले आहेत. त्याचा उत्सव, मूर्तिकार आणि या व्यवसायावर झालेला परिणाम, भाविकांना हाेणारा फायदा-नुकसान यावर ‘दिव्य मराठी’ने मूर्तिकारांशी त्यांच्या कारखान्यात जावून संवाद साधून ग्राउंड रिपाेर्टच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश झाेत.

कोरोना संसर्गाच्या काळात २०२० मध्ये गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी शासनाने मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नकाे, असे निर्बंध घातले होते. गणेशोत्सवाच्या तोंडावरच झालेल्या निर्णयामुळे मूर्ती बनवणाऱ्यांचे सुमारे ६ कोटी रुपयांचे भांडवल त्यात गुंतले हाेते. २०२१ मध्येही हे निर्बंध कायम होते. परिणामी दाेन वर्षे निर्बंधांमुळे कर्जाचा डोंगर घेऊन व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकारांना काही दिवसांपूर्वी शासनाने मूर्तीच्या उंचीची मर्यादा काढल्याची गाेड बातमी दिली. त्यामुळे गत दाेन वर्षात गुंतलेली रक्कम माेकळी झाली तरी हा निर्णय उशिरा घेतल्याने माेठ्या मूर्तींसाठी वेळही मिळाला नाही, परिणामी फारसा फायदाही झालेला नाही. अशातच मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे निर्णयामुळे गुंतलेले पैसे परत मिळणार एवढाच काय ताे फायदा, असे मत विविध मूर्तिकारांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.

..तर फायदा झाला असता ः माेठ्या आकारातील गणेश मूर्ती तयार करण्यासाठी उत्सवापूर्वी ५ ते ६ महिन्यांपासूनच तयारी करावी लागते. वित्तीय संस्था कर्जासाठी प्रचंड कागदपत्रे मागतात. त्यामुळे खासगीतून पैशांची जुळवाजुळव करावी लागते. सन २०२० मध्येही आम्ही अशीच तयारी केली. मात्र मार्चमध्ये काेराेनाचा संसर्ग सुरू झाला अन् सर्वच ठप्प झाले. अशातच मूर्तीच्या उंचीवर मर्यादा असल्याने बजेटच काेलमडले. यंदा मात्र मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध काही दिवसांपूर्वी हटल्याने रात्रंदविस काम करून मूर्ती तयार केल्या. मात्र हाच निर्णय पूर्वीच झाला असता तर आणखी फायदा झाला असता, असेही निरीक्षण मूर्तिकारांनी नाेंदवले. निर्बंध हटवल्याने आता कर्जमुक्तीची घटिका समीप आल्याचा आनंद काही मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर होता.मराठवाडा, खांदेशातही मागणी ः मोठ्या आकारातील गणेशमूर्ती बनवणाऱ्या अकाेल्यातील मूर्तिकारांनी खांदेश व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आपली कला पाेहाेचवली आहे. अकाेल्यातील मूर्तींना जळगाव, हिंगाेली, नांदेड, वाशीम, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडासह अकाेला जिल्ह्यातून मागणी असते.

सुवर्णमध्य काेण काढणार? ः जिल्ह्यात २०२२ वर्षाकरीता गणेशाेत्सवा दरम्‍यान प्‍लास्‍टर ऑफ पॅरीसच्‍या मूर्ती निर्मिती व विक्री करण्‍यास अटी-शर्तीसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २० मेच्या अधिसूचनेनुसार पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्‍यासाठी प्‍लॉस्‍टर ऑफ पॅरिसच्या वापरास प्रतिबंध करण्यात आले होते. मात्र पर्यावरण समितीच्या बैठकीनंतर ही परवानगी देण्यात आली. पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदूषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून मंडळाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या हाेत्या. त्यामुळे पीओपीबाबत स्पष्ट व वेळीच धाेरण आखावे, मूर्तींचे विसर्जन शास्त्रीय पद्धतीने हाेऊन प्रदूषण टळावे, उत्सव उत्साहात व पर्यावरण पूरक व्हावा, काेणत्याही घटकाचे आर्थिक नुकसान हाेणार नाही, काेणीही बेराेजगार हाेणार नाही, याअनुषंगाने सुवर्णमध्य निघण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...