आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेचा निर्णय:सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी मिळणार हक्काचे पैसे

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच त्यांचे सर्व हक्काचे पैसे दिले जाणार आहे. तसेच या सेवा निवृत्तीसाठी चार कोटी रुपयांची तरतूद केली असून, ते वेगळ्या खात्यामध्ये टाकून दुसऱ्या कामासाठी वापरण्यास आयुक्तांनी मनाई केली आहे.

आर्थिक गाडी रुळावर

महापालिकेची आर्थिक गाडी रुळावरुन घसरल्याने महापालिका कार्यालयातील कर्मचारी सेवा निवृत्त झाल्या नंतर त्याला सेवा निवृत्ती नंतर मिळणाऱ्या त्याच्या हक्कांच्या पैशासाठी चपला झिजवाव्या लागत होत्या. दोन ते सात वर्ष ही रक्कम मिळण्यास लागायची. तसेच सेवा निवृत्ती वेतनही नियमित मिळत नव्हते. अनेक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे तर ही रक्कम मिळण्या अगोदर निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना चकरा माराव्या लागल्या. मात्र, आता परिस्थितीत बदल झाला आहे. या सर्व बाबी आयुक्त कविता द्विवेदी यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर कर्मचाऱ्यांना नियमित एक तारखेला वेतन तसेच सेवा निवृत्ती नंतर मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळायला हवेत, यासाठी आर्थिक गाडी रुळावर आणली.

प्रशासनाने दिले आदेश

गेल्या वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक तारखेला वेतन दिले जाते. याच बरोबर महागाई भत्ता, सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम आदी सर्व हक्काचे पैसे नियमित दिले जात आहे. त्याच बरोबर सेवा निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम, रजा रोखीकरण, ग्रॅज्युटी आदीची रक्कम सेवा निवृत्तीच्या दिवशीच दिले जात आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी चार कोटी रुपयाची केवळ तरतूद केलेली नाही तर ते वेगळ्या खात्यात टाकून महापालिकेतील जो कर्मचारी सेवा निवृत्त होईल, त्याला त्याच दिवशी त्याच्या हक्काचे सर्व पैसे दिले जात आहेत. विशेष म्हणजे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी टाकलेले हे पैसे अन्य कोणत्याही कामासाठी खर्च न करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्याच दिवशी त्याच्या हक्काचे पैसे मिळत असल्याने सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पुढे काय?

कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत बोटावर मोजण्या इतक्या आयुक्तांनी लक्ष दिले आहे. तूर्तास आयुक्तांनी याकडे लक्ष दिले आहे. मात्र हीच परंपरा आयुक्तांच्या बदली नंतरही सुरू राहील की पुन्हा ये-रे माझ्या मागल्या होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...