आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:कृषी उत्पन्न उपबाजारातील व्यापाऱ्यांच्या बंद मुळे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदाेलन

वाडेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उपबाजार येथे मार्केटिंग फी आणि सुपर व्हीजन फीचे दर कमी करण्याची मागणी स्थानिक उपबाजारच्या व्यापाऱ्यांनी केली होती. काही दिवसांआधी यासंदर्भात निवेदनही देण्यात आले होते. मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने सर्व व्यापाऱ्यांनी रविवारी बंद पुकारला. दरम्यान या बंदची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला.

परिसरातील शेतकरी शेतमाल घेऊन वाडेगाव येथे येतात. मात्र रविवारच्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदची शेतकऱ्यांना पूर्वकल्पना नसल्याने शेतकरी शेतमाल घेऊन उपबाजारात दाखल झाले. ३० ते ३५ गावांहून शेतकरी येथे आले होते. येथे खरेदी बंद असल्याने शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी रास्ता रोको आंदाेलन केले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्ता राेकाे आंदाेलनाची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे आणि तहसीलदार सय्यद यांनी येथे येऊन व्यापाऱ्यांना माल घेण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही पुन्हा बंद पुकारू या अटीवर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल घेण्यास सुरुवात केली त्यानंतर उपबाजारातील कामकाज सुरळीत सुरू झाले.

बातम्या आणखी आहेत...