आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला:परमबीरसिंग बदल्यांसाठी घ्यायचे प्रत्येकी 1 कोटी रुपये, अकोल्यातील पोलिस निरीक्षक घाडगेंचा ‘लेटरबॉम्ब’

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.

घाडगे यांनी पत्रात लिहिले आहे की, परमबीरसिंग यांनी पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. दोन पोलिस कॉन्स्टेबल २० वर्षांपासून त्यांच्यासोबत खासगी व्यवहार पाहण्यासाठी व बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. परमबीर यांनी बेनामी संपत्ती कोठे व कुणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्याच्या नावावर २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यांच्या एका मित्रामार्फत १० ते १५ लाख रुपये घेऊन रिव्हॉल्व्हर लायसन्स दिले जात होते. त्यांच्यामार्फत बिल्डरची कामे कोट्यवधी रुपयांची सेटलमेंट करून दिली जात. जो अधिकारी त्यांचे ऐकत नव्हता त्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात येत होती. परमबीरसिंग यांनी माझ्याविरुद्धसुद्धा पाच खोटे गुन्हे नोंदवले होते. बदल्यांचे पैसे जमा करण्यासाठी राजू अय्यर नावाचा एजंट ठेवला होता. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासाठी ५० लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते.

दिवाळी भेट म्हणून त्यांनी डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहायक पोलिस निरीक्षकाकडून २० ते ३० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे व पोलिस निरीक्षकाकडून ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे त्यांनी बिल्डर बोमन इराणी आणि रुतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपरवजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. अवैध वाळू व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केल्यास त्या पालिस अधिकाऱ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकवले जात होते. त्यामध्ये मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. याबाबत मी १७ मार्च २०१६ रोजी तक्रार दिलेली आहे. परमबीर यांनी त्यांचा मुलगा रोहन याच्या नावाने सिंगापूर येथे व्यवसाय सुरू केला असून त्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अॅन्टालिया रोडवर त्यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. परमबीर यांची पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अॅन्ड कंपनी ही उघडली असून तिचे कार्यालय इंडिया बुल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे. त्या कंपनीच्या संचालक आहेत. या कंपनीत पाच कोटींची गुंतवणूक आहे. माझ्याकडे असलेल्या तपासातील गुन्ह्यातील आरोपींची नावे काढून टाकण्याचे आदेश परमबीर यांनी दिले होते. ते न ऐकल्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची नावे काढून टाकण्यात आली. त्याबदल्यात त्यांनी २०० कोटींचा भ्रष्टाचार केला.

२०१५, २०१६ मध्येही घाडगे यांनी केल्या होत्या तक्रारी
सलील चतुर्वेदी यांना अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात परमबीरसिंग व केंजळे यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले असतानाही फक्त पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र परमबीरसिंग आयपीएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यात आले, असाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परमबीर यांच्यासारख्या गुन्हेगारास शिक्षा करण्याऐवजी ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, असा उल्लेख घाडगेंनी पत्रात केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २१ सप्टेंबर २०१५ व मार्च २०१६ रोजी परमबीरसिंगांविरुद्ध घाडगे यांनी तक्रारी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...