आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेल्मेट न घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरच आरटीओने बुधवारी ६ एप्रिलला कारवाया केल्या. पोलिस अधीक्षक कार्यालयात जावून कारवाया करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हेल्मेट न घालणाऱ्या अशा २२ पोलिसांवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
अकोला जिल्ह्यात ना पोलिस हेल्मेट वापरत ना वाहनधारक. हेल्मेटसक्ती नसल्याने त्यांच्यावर कारवायासुद्धा केल्या जात नाहीत. मात्र, वाहतुकीच्या नियमांमध्ये हेल्मेट हे सक्तीचे आहे. मात्र कुणीही हेल्मेट वापरत नाही. अशातच आरटीओ विभागाने हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीमच सुरु केली आहे. सर्वात आधी आपल्याच कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे केले. सरकारी कर्मचारी हेल्मेट वापरणे सुरु करतील तेव्हा त्यांच्यापासून बोध घेत इतर वाहनधारकही हेल्मेट वापरतील, हा या मागचा उद्देश आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही ही मोहीम राबवण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाबाहेर ही मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे कारवाईची माहिती व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे हेल्मेट परिधान करून कार्यालयात आले होते. बुधवारी ६ एप्रिलला पोलिसांवरच कारवाया केल्याने आरटीओची मोहीम चर्चेची राहिली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक गजानन दराडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ढाले, हरणे, मुरडीव व वाहन चालक गौतम आरखराव यांनी ही कारवाई केली.
वाहतूक पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह ः कोणतेही नियोजन नसल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. केवळ दंडात्मक कारवायांपुरते पोलिस चौका-चौकांमध्ये दिसून येतात. पादचारी जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालताना दिसताहेत. कोणते वाहन कुठून येईल आणि अपघात होईल, हे सांगता येत नाही. हेल्मेट नसणाऱ्यांवर जर पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर आरटीओला पोलिस अधीक्षक कार्यालयात जावून कारवाया करण्याची गरज पडली नसती. मात्र वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती नसल्याने वाहतूक पोलिसांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर कारवाई
जिल्हाधिकारी व आरटीओ कार्यालय - ६१, तहसील कार्यालय - ३१, पंचायत समिती कार्यालय - ४२, महापालिका - ५७, जिल्हा परिषद - ५८ पोलिस अधीक्षक कार्यालय- २२
रस्त्यावरील अपघातात डोकं कुणाचंही असू शकतं
रस्त्यावर अपघात होऊन पडलेला कोण आहे, हे रस्त्याला माहित नसते. त्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट वापरले पाहिजे. जिल्ह्यात दुचाकी अपघातांमध्ये जितके बळी गेले त्यात कुणीही हेल्मेट घातले नव्हते. यंत्रणा कारवाया करण्याचे काम करेल मात्र डोके आपले आहे, हे समजून सर्वांनी हेल्मेट वापरावे. जयश्री दुतोंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.