आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिष्टान्नाचे दिले जेवण:लग्नात वृद्धाश्रमातील निराधारांना साडीचोळी ; नवदाम्पत्याकडून विधायकतेची सप्तपदी

अकोला / करुणा भांडारकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या प्रत्येक शुभ समारंभाला सामाजिक कार्याची किनार अवश्य असावी. यातून काहीप्रमाणात समाजऋण फेडले जाते, गरजूंना मदत होतेच, पण त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद सर्वाधिक मोलाचे ठरतात. याच उद्देशातून येथील बाठे कुटुंबाने आपल्या मुलांच्या लग्नकार्यात वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांना आमंत्रित केले. समारंभात वृद्धांना साडी-चोळी व मिष्ठांनाचे जेवण दिले. यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यांवर वेगळाच आनंद दिसून येत होता.

केशव नगरातील प्रभाकर व सुषमा बाठे यांचा मुलगा इंजिनिअर विवेक प्रभाकर बाठे यांचा मुंबईतील आर्किटेक्ट हेनल देढीया यांच्यासोबत विवाह झाला. या लग्नसमारंभातून सामाजिक कार्याला हातभार लागावा, अशी वराची आई सुषमा बाठे यांची इच्छा होती. यामुळे त्यांनी संपूर्ण लग्नकार्य शिवापूरस्थित मातोश्री वृद्धाश्रमात आयोजित करण्याचे ठरवले. वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या आयुष्यातील एकटेपणा काही काळासाठी का हाेईना दूर करणे, तसेच संस्थेला आर्थिक सहकार्य करणे हा यामागील हेतू होता.

नियोजनानुसार १८ डिसेंबरला मातोश्री वृद्धाश्रमात सकाळी थोडक्यात लग्नकार्य आटोपले. त्यानंतर तेथेच सायंकाळी स्वागत समारंभ झाला. दोन्ही सोहळ्यात वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मोठ्या आदराने सहभागी करून घेण्यात आले. सकाळी संपूर्ण कुटुंबाने वृद्धाश्रमातील मंडळींसोबत जेवणाचा आनंद घेतला. सायंकाळी वृद्धांना साडी-चोळी, कपडे व मिष्ठानाचे जेवण देण्यात आले. वृद्धाश्रमात राहत असल्याने ज्येष्ठांना अशा समारंभाचा आनंद घेता येत नाही. मात्र, बाठे कुटूंबाच्या पुढाकारामुळे या मंडळींसाठी हा अनुभव निश्चितच विशेष समाधान देणारा ठरला.

वृद्धांच्या आशीर्वादाने गहिवरून आले आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. अशावेळी लोकांच्या आशीर्वादाशिवाय काहीच उपयोगी पडत नाही. अनुभवातून आमच्या कुटुंबाची ही भावना आहे. यामुळे शुभकार्यातून हे ऋण फेडण्याचा विचार केला. या वेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी दिलेल्या भावपूर्ण शुभेच्छांमुळे आम्हा सर्वांना गहिवरून आले होते. समारंभातील हे क्षण सर्वाधिक मोलाचे होते. जन्मदात्या आई-वडिलांना कुठल्याही मुला-मुलींनी वृद्धाश्रमात ठेवू नये, असेच यानिमित्त सांगावेसे वाटते. विवेक-हेनल बाठे, वर-वधू

बातम्या आणखी आहेत...