आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:सर्वोपचारचे पीएसए ऑक्सिजन प्लँट असून अडचण नसून खोळंबा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड संसर्गाच्या काळात उभारण्यात आलेले पीएसए (प्रेशर स्विंग एडजॉर्प्शन) हे हवेतून मेडिकल ऑक्सिजन घेणारे तीन प्लॅन्ट सध्या वापराविना आहेत. त्यामुळे सध्या ‘जीएमसी’ला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. या प्लॅन्टद्वारे ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभागाला ऑक्सिजन पुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. शिवाय या तीन प्रकल्पांचा मेंटेनन्स आणि मनुष्यबळासह वार्षिक खर्च हा दोन कोटीहून अधिक असल्याने ऑक्सिजन विकत घेऊन वापरणे सर्वोपचार रुग्णालयासाठी सोयीचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती. शासकीय आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई भासत होती. वेळेवर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने अनेकांना प्राणही गमवावे लागले. या खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यात एलएमओ अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि पीएसए अर्थात प्रेशर स्विंग एडजॉर्प्शन हे मेडिकल ऑक्सिजनचे प्लॅन्ट उभे करण्यात आले. हे प्लॅन्ट अनेक रुग्णांसाठी कोविड काळात जीवनदान देणारे ठरले. मात्र कोविडनंतर ते वापराविना पडून आहेत. या प्लॅन्टद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन अतिदक्षता विभाग किंवा ऑपरेशन थिएटरमधील रुग्णांना देणे तांत्रिकदृष्ट्या सोयीचे नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीएसए प्लॅन्ट केवळ कोविडपुरतेच उपयोगाचे ठरल्याचे दिसून येत आहे.

दोन एलएमओ प्लॅन्ट : सर्वोपचार रुग्णालयात तीन पीएसए प्लॅन्टशिवाय दोन एलएमओ अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लॅन्ट आहेत. या प्लॅन्टची प्रत्येकी क्षमता ही १० केएल (किलो लिटर) एवढी आहे. जुन्या इमारतीमधील मेडिसीन वाॅर्ड नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर हे प्लॅन्ट वापरात येऊ शकतील.

वीजनिर्मितीच्या उपयोगात येईल
कोविडमधील ऑक्सिजनची गरज संपल्यामुळे जीएमसी परिसरात लावलेला महाजनकोचा पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राचा प्लॅन्ट पारसमध्ये विजनिर्मितीच्या वापरात येऊ शकतो. सध्या या प्लॅन्टची आवश्यकता नसल्याने तो घेऊन जाण्यासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे हा प्लॅन्ट विजनिर्मितीच्या उपयोगात येईल.
- डॉ. मीनाक्षी गजभीये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

दोन कोटी रुपयांचा खर्च
पीएसए ऑक्सिजनच्या एका प्लॅन्टसाठी व्यवस्थापन आणि मनुष्यबळाचा वार्षिक खर्च हा ८० ते ९० लाख रुपये आहे. या प्रमाणे तीन प्लॅन्टसाठी येणारा वार्षिक खर्च हा २ कोटी ४० लाख रुपये ते २ कोटी ७० लाख रुपयांपर्यंत
येऊ शकतो. सर्वोपचार रुग्णालयाला वर्षाकाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजनचे सिलिंडर खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च येतो.

पीएसए प्लॅन्टचा वेग हा तीन ते सहा लीटर पर मिनीट असतो. मात्र व्हेंटिलेटरसाठी दहा ते बारा लीटर पर मिनीट स्पीडने गॅसची आवश्यकता असते. त्यामुळे खर्च करूनही ऑक्सिजन व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात वापरता येत नाही. वाॅर्डातील मोजक्या आणि सामान्य रुग्णांसाठी हा प्लॅन्ट फायद्याचा आहे. पण तेवढी मागणी नाही. पीएसएचे तीन प्लॅन्ट सुरू केले तर मनुष्यबळ लागणार आहे. एका प्लॅन्टसाठी तीन सत्रांमध्ये दोन अशा सहा कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते. हा खर्च परवडणारा नाही, असे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...