आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी:पावसाळ्यात होणाऱ्या 7 प्रमुख रोगांपासून जनावरांना वाचवा, तज्ज्ञांनी सांगितले लक्षणे

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात विविध रोगाचे जंतू जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे रोगांना बळी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी असे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्थेचे डॉ. प्राजक्ता कुरळकर व डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी केले आहे. तज्ज्ञांनी जनावरांमधील विविध रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली आहे.

घटसर्प : गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये होणारा संसर्गजन्य रोग. हवामानात तीव्र बदल झाल्यास, असंतुलित आहार, जनावरांना लांब अंतरावर नेल्यास प्रादुर्भाव. दूषित चारा, पाण्यामार्फत प्रसार होतो. लक्षणांमध्ये ताप, खाणे पिणे सोडणे, नाक व तोंडातून स्त्राव, घशाला सूज, डोळे लाल होणे.

फऱ्या/ एक टांग्या : लहान जनावरांमधील संसर्गजन्य रोग. प्रसार दूषित अन्न व दूषित जखमांतून लागण. ताप येणे, खांद्यावर सूज येणे, जनावराचे पाय लुळे होणे, चालतांना लंगडणे ही लक्षणे

हगवण : गाई-म्हशींना होतो. रोगाचे विषाणू जनावराचे डोळे, नाक व तोंडातील स्त्रावाच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी जनावरात पसरतो. लक्षणे : ४ ते ७ दिवस खूप ताप, प्रारंभी नाकातून घट्ट स्त्राव वाहणे, नंतर कोरडा खोकला, हगवण लागणे, जिभ, टाळू व हिरड्यांवर क्षती दिसून येणे.

पिपऱ्या : शेळ्यांमधील विषाणूजन्य साथीचा रोग. याला शेळ्यांचा प्लेग असेही म्हणतात. लक्षणे : अचानक ताप, नाकातून व डोळ्यातून पातळ स्त्राव वाहणे, जनावर सतत शिकत राहते, तोंडात, जीभेला पुरळ येणे, गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो.

सरा : डास, माशा व इतर कीटक चावल्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंट यामध्ये आढळते. लक्षणे : खूप ताप, जनावरे गोल गोल फिरतात, कठिण वस्तूवर डोके घासतात, भूक मंदावते, दूध उत्पादन कमी होते, वजन कमी होते.

थायलेरिओसिस : पिसवे चावल्यामुळे प्रसार. संकरीत जनावरे व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. लक्षणे : खूप ताप येणे, डोळे पिवळसर दिसणे व लघवी तपकिरी रंगाची होणे, रक्त कमी होऊन जनावर अशक्त होते. डोळ्यातून व नाकातून पाणी वाहणे.

बॅबेसिओसिस : पिसवे चावल्याने संकरीत जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. लक्षणे : जनावराला ताप येते व हृदयाचे ठोके वाढतात. भूक मंदावते, जनावर अशक्त होते, दूध उत्पादन कमी होते. जनावराच्या लघवीचा रंग कॉफी सारखा असतो.

प्रतिबंधात्मक उपाय

विविध संसर्गजन्य रोगांमध्ये बाधीत जनावरांना वेगळे ठेवणे, बाधीत मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावणे, पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण करणे, गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे आदी प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

बातम्या आणखी आहेत...