आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणी यमाजी यांचे प्रतिपादन:दुर्भिक्ष्य असताना पाण्याची बचत करणे म्हणजेच त्याची निर्मिती होय

शेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरखेड गावाला दत्तक घेऊन गाव केले गळतीमुक्त

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती होय, असे प्रतिपादन सहाय्यक अभियंता कल्याणी यमाजी यांनी तालुक्यातील वरखेड येथे केले.

संपूर्ण जगात २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने १६ मार्चपासून २२ मार्च पर्यंत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात आला होता. शहरात जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता कल्याणी यमाजी यांच्या संकल्पनेतून त्यांनी कोणत्याही प्रकारे शासकीय मदत न घेता स्वखर्चातून आगळीवेगळी जल जागृती करण्याचे निश्चित केले. त्यानुसार त्यांनी जनजागृती सप्ताहानिमित्त तालुक्यातील वरखेड बुद्रुक गावाला दत्तक घेऊन गाव पातळीवर प्रत्यक्ष पाण्याची बचत कशी होईल, त्या अनुषंगाने एका नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून वरखेड बुद्रुक गावाला प्रत्यक्ष भेट दिली.

यावेळी त्यांनी प्राथमिक पाहणी केली असता गावात जवळपास तीनशेच्यावर कुटुंबांना ग्रामपंचायतमार्फत नळ जोडणी केली आहे. प्रत्येक नळाला नियमितपणे पाणी पुरवठा देखील होतो. परंतु नळ जोडणी केलेल्या पाइपला कुठेही नळाची तोटी बसवण्यात आली नाही. त्यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष गावांत जाऊन गावकऱ्यांसोबत जनजागृती करून स्वत:च्या खर्चाने प्रत्येक नळास तोटी बसवण्याचा निश्चय केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वखर्चाने प्रत्येक नळाला तोटी बसवण्याची धडक मोहीम हाती घेतली. त्यामुळे वाया जाणारे हजारो लिटर पाण्याची बचत होऊ लागली. त्यांच्या या उपक्रमांमध्ये बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी, जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगावचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वरखेड बुद्रुक च्या सरपंच विजया गणेश कराळे, उपसरपंच चंद्रकला पंजाबराव शिरसाट, माजी सरपंच अर्चना केशवराव हिंगणे, सामाजिक कार्यकर्ते संजय पोकळे यांचे सहकार्य लाभले.

२१ मार्च रोजी जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभागाच्या उपकार्यकारी अभियंता कल्याणी श्रीशैल यमाजी यांचा वरखेड बुद्रुक येथील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी पाणी वाचवा हा संदेश देऊन गावामध्ये स्वखर्चाने सर्व घरातील नळांना तोट्या बसवून गाव गळती मुक्त केल्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाला गावकरी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...