आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला जिल्ह्यातील धामणदरी (ता. बार्शीटाकळी) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेत संतापजनक घटना उघडकीस आली. या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर तेथील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले. सुमारे दोन महिने हा प्रकार सुरू होता. पालकांना तो समजल्यानंतर त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सहायक शिक्षक सुधाकर रामदास ढगे (५३) व राजेश रामभाऊ तायडे (४५, दोघे रा. अकोला) या नराधमांना तातडीने अटक केली. गुरुवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
भयभीत मुलींनी शाळेत जाणे बंद केल्यामुळे उघडकीस आले प्रकरण
धामणदरी हे छोटेसे गाव अकोल्यापासून ३० ते ४० किमी अंतरावर. या गावात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग. तिथे फक्त चार मुली व पाच मुले शिक्षण घेतात. तिथे सुधाकर ढगे व राजेश तायडे हे दोनच शिक्षक नियुक्त होते. त्यांच्या विश्वासावर पालक दहा वर्षांच्या मुलींना शाळेत पाठवत. मात्र शिक्षक पेशाला काळिमा फासत या दोन नराधमांनी चारही मुलींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे मुली भयभीत झाल्या. त्यांनी शाळेत जाणेच बंद केले. पालक त्याबाबत विचारणा करत, मात्र घाबरलेल्या मुली काहीच बोलत नसत. एका मुलीने अखेर पालकांना खरे कारण सांगितले. तेव्हा शिक्षकांकडून होणाऱ्या अत्याचाराचा प्रकार समोर आला. या पालकांनी इतर तीन कुटुंबांशी संपर्क साधला. अखेर चारही पालकांना अत्याचाराबाबत माहिती मिळाली. त्यांनी बुधवारी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दिली. ठाणेदार संजय सोळंके यांनी तत्काळ दोन्ही शिक्षकांना अटक केली व त्यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
गावकरी, शिवसेना आक्रमक होताच कारवाई
या घटनेची माहिती कळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी व काही ग्रामस्थांनी जि.प. सीईओंची भेट घेऊन या नराधम शिक्षकांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली. पोलिसांकडून कारवाईची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाईचा अहवाल सादर केला. त्यानंतर सीईओ यांनीही ढगे व तायडे या दोन्ही शिक्षकांना ६ एप्रिलपासून तातडीने बडतर्फ केले.
पालकमंत्री, महिला आयोग अध्यक्षा अनभिज्ञ
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. तर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही अत्याचाराची दखल घेतली नव्हती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.