आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे विधान परिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया व त्यांचे पूत्र आमदार विल्पव बाजोरीया यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह २ माजी नगरसेवक, उपशहर प्रमुख, युवा सेना जिल्हाध्यक्षांसह जवळपास २६ जण शिंदे गटात सहभागी झाल्याने जिल्हयात शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच, गोपीकिशन बाजोरीया यांना शिंदे गटाकडून संपर्क प्रमुखपदही बहाल करण्यात आले आहे.
अंतर्गत गटबाजी
अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही गटबाजी कमी नाही. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांचा गट असल्याची चर्चा नेहमीच रंगते. राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून जिल्ह्यात राजकीय पेरणी सुरू झाली. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत 2 नेत्यांनी तर अकोल्यात सेनेच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ५० ते ६० आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची शिंदे गटात सहभागी होण्याच्या अनुषंगाने बैठक झाली होती. त्या बैठकित शिवसेनेत कसे डावलण्यात आले, याचा पाढाच वाचण्यात आला होता.
शिंदे यांची भेट
दरम्यान, बुधवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेश केला. यात बाजोरीया पिता-पूत्रांसह उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, माजी नगरसेवक शशीकांत चोपडे, अश्विन नवले आदींचा समावेश होता.
लवकरच अन्य नियुक्त्या
शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी मिळण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. यावर आगामी निवडणुकीत भाजपसोबत युतीचे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले असून, अन्य सहकार्यही देण्याची ग्वाही मिळाल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात लवकरच अन्य युक्त्या होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.