आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई काही दिवसात न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन केले जाईल. यास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा शिवसेनेचे पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला. २ जूनला शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, नितीन मिश्रा, शरद तुरकर, राहुल कराळे, विजय परमार उपस्थित होते. पावसाळा तोंडावर आलेला असताना मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे काम संथगतीने सुरु आहे. नाल्यांच्या साफसफाई बाबत प्रशासनाला निवेदन दिले, चर्चाही केली. मात्र या मागणीची दखल घेतली गेली नाही. नाल्यांची साफसफाई न झाल्यास सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात मोठ्या नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरु न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल.राजेश मिश्रा म्हणाले, गत वर्षी पावसाळ्यापूर्वी सत्ताधारी, प्रशासनाने नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील विविध भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. यावेळीही प्रशासनाने नाल्यांची सफाई धिम्यागतीने सुरु केली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. बुधवारी पावसाने शहरात हजेरी लावली. मात्र अद्यापही प्रशासनाने मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम गतीने सुरु केलेले नाही. शहरातील लोणटेक, अकोट फैल, हरिहरफेठ, शिवसेना वसाहत, गिता नगर, जठारपेठ, कैलास टेकडी आदींसह इतर मोठ्या नाल्यांची सफाई सुरु केलेली नाही. पाऊस सुरु होण्यापूर्वी मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असेही ते म्हणाले.
महापालिकेतील अधिकारी चुकीची माहिती देतात प्रशासनाला मनपातील अधिकारी चुकीची माहिती पुरवतात. त्यामुळे यावेळी मनपा कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाला सफाईचे काम सुरु करण्यात आले. यामागे पैशाची बचत हा उद्देश असला तरी कर्मचाऱ्यांच्या हातून योग्यरित्या नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाने स्वत: या गंभीरबाबीकडे लक्ष द्यावे. नदी पात्रातही मोठ्या प्रमाणात जलकुंभी पसरली आहे. जलकुंभीमुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. प्रशासनाने या बाबत त्वरित उपाय योजना कराव्यात, असेही राजेश मिश्रा म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.