आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या चर्चा सुरू आहेत. ही युती सध्यातरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती मर्यादित असली तरी ती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही होईल, हे आज निश्चित सांगता येत नसले तरी ‘वंचित’चा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात ही युती भाजपच्या एकतर्फी विजयाचा रथ रोखू शकते.
अकोला जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. त्यात शिवसेनेच्या वाट्याला एकच मतदारसंघ आला होता. पाचपैकी चार विधानसभा क्षेत्रात दोन नंबरची मते वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती. तर पाचही मतदारसंघातून ३१.० टक्के मते भाजपला तर वंचित बहुजन आघाडीला २७.१ टक्के मते मिळाली होती.
दोन्ही पक्षाच्या मतांमध्ये ४ टक्के मतांचा फरक होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढले होते. तेव्हा भाजपला ३४.५ टक्के मते, भारिप बमसं आताचा वंचित बहुजन आघाडीला २३.८ टक्के, शिवसेनेला ११.४, काँग्रेसला १३.८ टक्के मते मिळाली होती. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यास त्यांच्या मतांचा आकडा हा भाजपच्या वर जातो.
जिल्ह्यात युतीचा फायदा कुणाला?
शिवशक्ती भीमशक्ती युतीची चर्चा जोर धरत असताना नेमका या युतीचा फायदा ‘वंचित’ला किती होईल याविषयी दोन मतप्रवाह आहेत. या दोन्ही पक्षांचा मतदार वेगवेगळा आहे. ‘वंचित’चे मतदार बाळासाहेबांच्या (अॅड. प्रकाश आंबेडकर) आदेशावर चालतात.
त्यामुळे शिवसेनेला निश्चित फायदा होऊ शकतो; मात्र शिवसेना आणि भाजपचा मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करत असल्याने ‘वंचित’कडे जाण्याऐवजी तो भाजपकडे वळण्याची शक्यता अधिक आहे, असे असले तरी ‘वंचित’ला विजयासाठी ‘शिगे’ची आवश्यकता असते, ती या माध्यमातून पूर्ण होईल, असा आशावाद ‘वंचित’च्या धुरीणांना आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.