आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात गुन्हेगारांवर एकाच वेळी ‘मोक्का’ कारवाई:अकोला शहरातील संघटित गुन्हेगारीला लगाम

अकोला8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) अकोला पोलिसांनी एकाच वेळी सात गुन्हेगारांवर मोक्का लावला. सातही गुन्हेगार हे टोळीने गुन्हे करणारे असून, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारावर मोक्का, हद्दपार, स्थानबद्ध अशा कारवायांचा सपाटाच लावला आहे. सिव्हिल लाइनचे प्रभारी पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगार सुहास सुरेश वाकोडे (२५, टोळी प्रमुख), ऋतीक सुधिर बोरकर (२०), गणेश राजू कॅटले (२५), राहुल नामदेव मस्के (२१), सोनू उर्फ विशाल सुनील मंदीरेकर (२१), विशाल महादेव हिरोळे (२२) आणि दर्शन सुभाष नंदागवळी (२३) सर्व रा. अकोला यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. शहरात वर्चस्व कायम राहावे, ते वास्तव्यास असलेल्या भागात त्यांची दहशत कायम राहावी, यासाठी हे सर्व आरोपी स्वतंत्रपणे व टोळीने गुन्हे करीत होते. या सर्व गुन्हेगारांवर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्याचा परिणाम होत नसल्याने या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. जुगार अड्ड्यावर छापा : एमआयडीसी पोलिसांनी शिवर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी केली. चेतन काशिनाथ जाधव, शंकर काशिनाथ जाधव यास ताब्यात घेतले.

मोक्कामध्ये गुन्हेगारांना लवकर जामीन होत नाही राज्य सरकारने मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी ‘टाडा’ कायद्याच्या धर्तीवर १९९९ मध्ये मोक्का कायदा तयार केला. या कायद्याचा आधार घेऊन संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. ‘मोक्का’चा आधार घेत अनेक गुंडाना पोलिसांनी तुरुंगात पाठवले. अनेक टोळ्यांवर प्रभावीपणे ‘मोक्का’ लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. ‘मोक्का’ कायद्यामध्ये अटक केल्यानंतर गुन्हेगारांना लवकरात लवकर जामीन होत नाही. त्यामुळे मोक्का लावला की गुन्हेगार कमीतकमी तीन ते पाच वर्ष तुरुंगात जातात.