आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘अभ्यासाची वही दाखवायला गेलाे की सर दुसऱ्या खोलीत न्यायचे. वही तपासताना माह्या कपड्यात हात घालायचे. कपडे न घातलेल्या बायांचे व्हिडिओ आम्हाला मोबाइलवर दाखवायचे. पाह्यलं नाय तर रागवायचे. एके दिवशी सरांनी खोलीत एकटीला नेऊन माहे कपडे काढले, डोळ्याला पट्टी बांधली. अंगाला सगळीकडे हात लावत होते. मी खूप घाबरले. पण, तवापासून शाळंत जायाची भीती वाटाया लागली... ही आपबीती सांगताना चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अनिताच्या डोळ्यात भीती दिसत होती.
अकोला जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अत्यंत दुर्गम भागातील धामणदरी (ता. बार्शीटाकळी) गावातील ही भयंकर कहाणी एकट्या अनिताची नव्हे तर तिच्यासोबत शिकणाऱ्या इतर तीन चिमुकल्यांचीही आहे. त्यांच्या नजरेतही सरांबद्दल हीच दहशत दिसून आली. या प्रकारानंतर चार दिवस झाले मुली नीट जेवल्या नाहीत की कुणाशी मोकळ्या बोलत नाहीत, त्यांच्या आईने काळजीच्या सुरात व्यथा मांडली.
प्रकरण : दोन नराधमांचा ४ विद्यार्थिनींवर अत्याचार
अकोला जिल्ह्यातील धामणदरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या दोन नराधम शिक्षकांनी गावातील ९ ते १० वर्षांच्या चार विद्यार्थिनींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पालकांना कळताच त्यांनी सुधाकर ढगे व राजेश तायडे या दोन नराधम शिक्षकांना पोलिसांच्या हवाली केले. सध्या ते दोघेही कोठडीची हवा खात आहेत. दिव्य मराठीच्या टीमने शुक्रवारी या गावात जाऊन चारही पीडितांकडून त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणी एेकली.
आपबीती : सर आमच्याशी नेहमीच घाणेरडे वागायचे
(या बातमीतील चारही पीडित मुलींची नावे काल्पनिक आहेत.)
पोलिसात सर्वप्रथम तक्रार दाखल करणारी अनिता सांगू लागली... ‘सर आमच्याशी नेहमीच असे घाणेरडे वागायचे. घरी न सांगण्याची तंबीही द्यायचे. आम्ही चौघी खूप घाबरलेल्या होतो. एके दिवशी मी सिद्धीला ‘सर घाणेरडे वागतात’ हे सांगितले. तेव्हा तीही म्हणाली, मला तायडे सरांनी खोलीत नेऊन ओठाला ओठ लावले.
वनिता म्हणाली, ‘सर रोजच माझ्या कपड्यात हात घालत. म्हणून मी घरी सांगेन असे म्हणाले, तर त्यांनी मला छडीने मारले. मी आजाला घेऊन शाळेत गेले. सर म्हणाले, अभ्यास केला नाही, म्हणून मारले. आजा मलाच रागावला. म्हणून मग नंतर घरी काहीच सांगितले नाही. ’
अनिता, सिद्धी व वनिता यांना आपल्यावर अत्याचार झालाय हे अद्यापही कळत नव्हते. पण सरांनी वंगाळ केलंय (बॅड टच) याची जाणीव मात्र त्यांच्या भिरभिरत्या नजरेतून पदोपदी दिसून येत होती. त्यांच्या चौथ्या मैत्रिणीच्या तोंडून मात्र अजून एक शब्दही फुटलेला नव्हता. ‘सर 'फुगा' दाखवायचे असे तिने मला सांगितले होते,’ असे तिची आई म्हणाली. {अत्यंत अबोल असलेल्या सिद्धीने महिनाभरापूर्वी फक्त आईला असा प्रकार सांगितला होता. पण त्यांनी मुलीच्या बोलण्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तायडे सरांनी एके दिवशी अनिताला वर्गखोलीत बांधून विवस्त्र केले, तेव्हा मात्र ती खूप घाबरली. पण त्या दिवशीपासून या चौघींही शाळेत जाण्यास धजावत नसत. पालकही कारण विचारू लागले. मग मात्र हिमत करुन अनिताने आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे शब्द एेकून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी सायंकाळी पतीला माहिती दिली. मग दोघांनी एकत्र येऊन पुन्हा अनिताला विचारले. ती ठाम होती. केवळ माझ्यासोबत नव्हे तर इतर तिघींनाही सर असाच त्रास देतात असे तिने सांगितले. चारही कुटुंबे शेजारीच राहात असल्याने त्यांनी एकमेकांशी बोलून खातरजमा करुन घेतली. चौघींवरही अत्याचार होत असल्याचे समोर आले. आया काळजीत होत्या. तर पुरुष मंडळींची तळपायाची आग मस्तकाला गेली. उद्या गावात आले की दाेन्ही मास्तरांना चोपून काढू असे त्यांनी ठरवले. पण एकाने समजूतदारपणा दाखवला. आपण हातावर पोट असलेले मजूर. उगाच कायदा कशाला हाती घ्यायचा. हे पैशावाले आपल्यालाच अडकवतील. त्यापेक्षा पोलिसांची मदत घेऊ, असे त्याने सांगितले. गावातील एक तरुण पोलिस ठाण्यात नोकरीला आहे, त्याला फोन करुन माहिती दिली. त्यानेही बार्शीटाकळी येथील पोलिस निरीक्षक संजय साेळंके यांच्या कानावर हे गंभीर प्रकरण टाकले. त्यांनीही तातडीने तायडे व ढगेला शाळेतून येताना रस्त्यातच उचलले. मग पीडित मुलींना व कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून महिला अधिकाऱ्यासमक्ष त्यांची फिर्याद लिहून घेण्यात आली.
शिक्षक असे तर मुलींनी कसे शिकावे?
अनिताची आई म्हणाली, आमचे शिक्षण झाले नाही म्हणून मजूरी करावी लागतेय. मुली शिकल्या तर चांगले दिवस दिसतील असे वाटत होते. पण, शिक्षकच असे असतील तर मुलींना शिकायला कसे पाठवायचे हा सवाल आमच्यापुढे आहे. आता, या दोघ शिक्षकांनी असे केले. नवीन शिक्षक मिळाले नाही तर मुलींचे शिक्षण संपले, अशी भिती त्यांनी बोलून दाखवली.
शेती नसली तरी चालेल, शिक्षण हवेच
चारही पोरी भेदरून आपबिती सांगत होत्या तेव्हा अनिताच्या ९० वर्षांच्या आजी कोपऱ्यात बसून त्यांच्याकडे काळजीच्या नजरेने पाहात होत्या. मधेच त्या म्हणाल्या, ‘शिक्षकाला आम्ही देव मानत होतो. पण, पहा त्यांनी काय केलं. ऐकवेळ शेती नसली तर चालेल पण मुला- मुलींना शिक्षण मिळालं पाहीजे. तरच आम्ही या जंगलातून बाहेर पडू शकतो’.
संबंधित वृत्त
मुलांच्या शिक्षणासाठी ‘त्यांचे’ नखरे सहन केले; आता शाळाच बंद पडण्याची धास्ती
गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुधाकर रामदास ढगे व राजेश रामभाऊ तायडे (दोघे रा. अकोला) या शिक्षकांची आमच्या गावात नियुक्ती आहे. क्वचितच दोघे एकत्र शाळेत यायचे. नाही तर आज हा तर उद्या तो अशी आळीपाळीने ड्यूटी करायचे. मुलं सकाळीच जाऊन तिष्ठत बसायची. गुरुजी मात्र तास-दोन तासांनी अकोल्याहून यायचे. शाळेच्या वेळेतही वर्गात झोपून राहायचे. आमचे गाव दुर्गम. यायला धड रस्ता नाही म्हणून इतर शिक्षक यायला कचरतात. कसे का होईना हे दोघे येतात म्हणून तरी मुलांचे शिक्षण सुरू आहे हा विचार करून आम्ही आजवर त्यांचे नखरे सहन केले. पण चिमुकल्या मुलींबाबत त्यांनी जो रानटी प्रकार केलाय ते ऐकून मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. आम्ही दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. नराधम तुरुंगात गेल्याचे समाधान आहे, मात्र आता आमच्या गावात दुसरे शिक्षक येतील का, की कमी पटसंख्येअभावी ही शाळाच बंद होईल, अशी भीती धामणदरी (ता. बार्शीटाकळी) येथील ग्रामस्थांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.