आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका लंपी रोगाचा..:अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 173 पशूंना दिली प्रतिबंधात्मक लस

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील पशूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून या चर्म रोगाचा प्रसार झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातर्फे युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 173 पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लम्पी चर्म रोगाचा प्रसार वाढत असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 585 पशु लम्पी चर्म रोगाने बाधित आढळले आहेत. उद्भव झालेल्या ठिकाणांच्या 5 किमी त्रिज्या परिसरातील गावांमध्ये असणाऱ्या एकूण जनावरांची संख्या 66 हजार 508 आहे. यापैकी 43 हजार 173 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण मोहिमेला वेगाची गरज

लंपी रोगाचा जिल्ह्यातील वाढता प्रसार लक्षात घेता लसीकरण वेगात होण्याची गरज पशूवैद्यकीय डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र पशुसंवर्धन विभाग अल्प मनुष्यबळाच्या समस्येला तोंड देत आहे. लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यकांचीही मदत घ्यावी, असे निर्देश राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 8 सप्टेंबरला अकोल्यात दिले होते. त्यानुसार तत्काळ कार्यवाही होण्याची गरज आहे.

जिल्ह्यात ज्या भागात लम्पी चर्म रोगाने बाधित पशु आढळतो तेथे तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपचाराअंती बहुतांश पशूठीक होत आहेत. आतापर्यंत दोन जनावरे दगावली आहेत. -डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

या बाबी महत्त्वाच्या

  • हा आजार संसर्गजन्य असून बाधीत व अबाधीत जनावरांचा संपर्क येऊ न देणे.
  • गोठ्यांचे निर्जंतूकीकरण, गोचिड गोमाशांचे निर्मूलन या सारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या.
  • लसीकरण व उपचार राबवित असताना अन्य जनावरांमध्ये फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा.
  • बाधीत जनावरे असलेल्या ठिकाणापासून 10 किमी त्रिज्या परिसरातील गुरांचे बाजार भरविण्यात येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...