आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • ST Workers Protest | Maharashtra | Allegations Of Protest Workers; Half naked Agitation Demanding How Many More Workers The Government Will Take

आत्महत्या नव्हे, व्यवस्थेकडून हत्याच:निषेध आंदोलक कर्मचाऱ्यांचा आरोप; सरकार आणखी किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार, असे विचारत अर्धनग्न आंदोलन

प्रतिनिधी |अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव एसटी आगारातील कर्मचारी विशाल अंबलकार यांनी निलंबनाच्या भीतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अकोल्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशालची ही आत्महत्या नाही, तर या व्यवस्थेने केलेली ही हत्याच आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असून अजूनही सरकारला जाग येत नाही.

त्यामुळे सरकार आणखी किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल अकोला आगारातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी गुरुवार, १८ नोव्हेंबरला व्यक्त केला आहे. जुन्या बसस्थानकातील आंदोलनस्थळी विशाल अंबलकार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, वेतन आणि इतर मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. अकोला शहरातील आगार क्रमांक एक आणि दोनमध्ये दररोज आंदोलन करून कर्मचारी आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

अकोला शहरातील दोन्ही बसस्थानकातील दीडशेहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. गुरुवारी आगार क्रमांक एक जुने बसस्थानक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी विशाल अंबलकार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खामगाव आगारात सहायक मेकॅनिक असलेले विशाल प्रकाश अंबलकार (वय २९) यांनी निलंबनाच्या भीतीने १६ नोव्हेंबरला रात्री राहत्या घरी विष प्राशन केले.

त्यांना तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अकोला आगारातील कर्मचाऱ्यांनी शोक आणि संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

अकोला शहरात जमावबंदी, रॅलीस मनाई संचारबंदीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ

अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले. यापूर्वी १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ पर्यंत जमावबंदी व संचारबंदी लागू केली होती. मात्र यात वाढ करून आता जमावबंदी व संचारबंदी २१ नोव्हेंबर वाढवण्यात आली, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी जारी केले आहेत.

यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी, तर सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरू राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढवणारे, भावना भडकवणारे असे कृत्य, वक्तव्य, अफवा पसरवण्यास मज्जाव करण्यात आला. समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही.

संचारबंदीचा दुसरा दिवस
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असून, आतापर्यंत ८४ कर्मचारी निलंबित झाले. गुरुवारी जुने बसस्थानकात अर्धनग्न आंदोलन करत खामगाव येथील कर्मचारी अंबलकार यांना श्रद्धांजली वाहिली व प्रशासनाचा निषेध केला. कर्मचाऱ्यांसाठी भोजन बनवले.

लढा सुरूच ठेवू

मागील १३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात सर्वत्र एसटी कर्मचारी संतप्त आहेत. न्याय्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. परंतु अद्यापही दखल घेतली जात नाही. हा लढा आता अर्ध्यावर थांबणार नाही. मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि बंद कायम ठेवणार आहोत. - सचिन हाताळकर, कर्मचारी.

कर्मचाऱ्यांत निराशा आणि भीती

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. निराशा आणि निलंबनाच्या भीतीपोटी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. आम्ही या बाबीचा तीव्र निषेध करतो. खामगाव आगारातील विशाल अंबलकार यांनीही आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्याच आहे. - संतोष राठोड, कर्मचारी

अकोल्यातून १४ कर्मचारी निलंबित
अकोला शहरातील आगार क्रमांक दोन येथून नऊ, तर आगार क्रमांक एकमधून पाच एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आंदोलनात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकांना निलंबित करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिकारी करत असल्याचा आरोप आंदोलकांमधून होत आहे. अकोला एसटी आगारातील स्थानिक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

फोन करून कर्मचाऱ्यांना धमकी देणे, कामावर येण्यास भाग पाडणे अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र दबावतंत्राचा वापर करून चालक आणि वाहकांची सेवा घेणे धोक्याचे आहे. हा वर्ग फ्रेश माइंडने काम करणारा आहे. त्यामुळे दबावतंत्राचा वापर अधिकाऱ्यांनी करू नये, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...