आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अद्याप 15 ते 20 हजार जोडण्या अवैध; विभागाचा अंदाज

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा क्षेत्रात आतापर्यंत ६५,९२० नळजोडण्या वैध झाल्या. तर अद्यापही १५ ते २० हजार नळजोडण्या अवैध असल्याचा अंदाज पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केला. दरम्यान अवैध नळजोडण्यांमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.

मनपाचा अमृत योजनेत समावेश झाल्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे सबलीकरणाचे काम सुरु केले. यासाठी ११० कोटी खर्च केले. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचाही यात समावेश होता. जलवाहिन्या बदलल्या नंतर जुन्या जलवाहिन्यांवरील वैध नळजोडण्या पुन्हा जोडून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती. यासाठी कंत्राटदाराला वेगळे पैसे दिले होते. चार वर्षापूर्वी मनपाने ३४ हजार नळजोडण्या पुन्हा जोडण्याचे काम करारानुसार कंत्राटदाराला दिले. चार वर्षापूर्वी मनपाच्या दप्तरी ३४ हजार नळजोडण्या वैध होत्या. तर मालमत्तांची संख्या दीड लाख होती.

त्यामुळेच शहरात अवैध नळजोडण्या आहेत, हे स्पष्ट झाले होते. हे लक्षात घेवून मनपाने अवैध नळजोडण्या वैध करण्यासाठी अभय योजना राबवली. अभय योजनेत ४०० रुपयात नळजोडणी वैध करण्यात आली. या योजनेला सतत मुदतवाढ देण्यात आली. मात्र ४०० रुपयात नळजोडणी वैध करताना दोन वर्षापेक्षा अधिक वर्षाचा कर थकीत नको, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे ज्या अवैध नळधारकांकडे दोन वर्षापेक्षा अधिक वर्षाचा कर थकीत आहे, त्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली. मात्र या योजनेचा चांगला परिणामही दिसुन आला. चार वर्षात वैध नळांची संख्या दुप्पट झाली. ही संख्या आता ६५ हजार ९२० झाली आहे.

शहरातील विविध भागात अद्यापही १५ ते २० हजार नळजोडण्या अवैध
महापालिका क्षेत्रात दिड लाख मालमत्ता आहेत. यापैकी ८२ ते ८५ हजार निवासी मालमत्ता आहेत. तर वैध नळधारकांची संख्या ६५ हजार ९२० आहे. त्यामुळे अद्यापही शहरात १५ ते २० हजार नळजोडण्या अवैध आहेत.

नळजोडण्या वैध करुन घेण्याचे आवाहन
अवैध नळजोडणी शोध मोहिम सुरु आहे. ज्या नागरिकांकडे अवैध नळजोडण्या आढळल्या, त्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली नळजोडणी नियमानुसार वैध करुन घ्यावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...