आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळणार आर्थिक मोबदला:स्त्री रुग्णालयाचे बुक माय ई-व्हेईकल ॲप कार्यान्वित; लाभ घेण्याचे आवाहन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरोदर माता व नवजात बालक रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, याकरिता जिल्हा स्त्री रुग्णालयाद्वारे बुक माय ई-व्हेईकल ॲप सुरू करण्यात आले. या सुविधेचा गरजू गरोदर मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.जिल्ह्यातील गर्भवतींना प्रसूतीकरिता येण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खासगी वाहन किंवा रुग्णवाहिका वापरता येईल. अशा वाहनाचे भाडे प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे संबंधित मातांच्या खात्यात ऑनलाइन अदा केले जाईल. त्याकरिता गरोदर मातांनी बुक माय ई-व्हेईकल या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.

प्रसूती व प्रसूतीपश्चात ४२ दिवसांपर्यंतच्या गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या नवजात बालकांना तातडीच्या उपचाराकरिता शासकीय व खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मातांना बुक माय ई-व्हेईकल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या मातेने खासगी वाहन किंवा रुग्णवाहिकेचा वापर केला असेल‍ अशा मातांनी वा त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचल्यानंतर बँकेचे पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा स्त्री रुग्णालयात जमा करावी. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाहन भाडे ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येईल. शासकीय रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास लाभ मिळणार नाही.

प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले दर याप्रमाणे : मारूती व्हॅनचे महापालिका क्षेत्रातील दर पाचशे रुपये प्रती एक फेरी २५ किमीपर्यंत. मनपा क्षेत्र सोडून १ हजार रुपये व जिल्ह्याबाहेर ११ रुपये प्रति किमीप्रमाणे राहील. टाटा सुमो व मेटॅडोरचे मनपा क्षेत्रातील भाडे दर सहाशे रुपये प्रती एक फेरी २५ किमीपर्यंत. मनपा क्षेत्र सोडून १४०० रुपये, तर जिल्ह्याबाहेर १२ रुपये प्रती किमी प्रमाणे राहील. टाटा ४०७ किंवा स्वराज मझदाचे मनपा क्षेत्रातील भाडे दर सातशे प्रती एक फेरी २५ किमीपर्यंत. मनपा क्षेत्र सोडून १३०० रुपये तर जिल्ह्याबाहेर १३ रुपये प्रती किमी प्रमाणे राहील. आयसीयू अथवा वातानुकूलित वाहनाचे मनपा क्षेत्र सोडून व जिल्ह्याबाहेर वातानुकूलित यंत्रणा बसवली असल्यास नमूद दरात १५ टक्के वाढ देय राहील. तसेच १०० किमीच्या वर १५ रुपये प्रती किमी प्रमाणे रक्कम संबंधितांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने रक्कम जमा करण्यात येईल, असे कळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...