आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रक्चरल ऑडिट:शहरामधील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाचे आज स्ट्रक्चरल ऑडिट

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट शुक्रवार, २ डिसेंबरला केले जाणार आहे. यासाठी मनपाने पाच लाख ४२ हजार रुपयांचा भरणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीकडे केला होता. स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महाविद्यालयाची तीन सदस्यीय समिती येणार आहे.

शहरात सन १९७७ मध्ये नवीन बस स्थानकामागील दोन आणि जुने शहरातील शिवनगर भागात जलकुंभ बांधण्यात आले होते. २००६ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना मनपाने स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी मजिप्राने हे तीन जलकुंभ क्षतिग्रस्त झाल्याची माहिती दिली होती. मात्र मनपाने या जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हे जलकुंभ धोकादायक ठरले आहे. दिव्य मराठीने जलकुंभाची पाहणी करून २७ ऑगस्ट रोजी ‘शहरातील ३ जलकुंभ धोकादायक स्थितीत; ४५ वर्षात एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी घेतली. त्यांनी थेट महापालिका प्रशासनाला वृत्त पाठवून याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. या नंतर खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने एकप्रकारे जलकुंभ क्षतिग्रस्त असल्याची कबुली देतानाच या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथून करून घेण्यात येईल. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार यावर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती शासनाला पाठवण्यात आली.

या अनुषंगाने महापालिका पाणी पुरवठा विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांना पत्र पाठवून शहरातील तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली होती. यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अप्लाइड मेकॅनिक्सचे असोसिएट प्रोफेसर बी. एस. लांडे त्यांच्यासह तीन जणांच्या सदस्यांसह स्ट्रक्चरल ऑडिटसाठी येत आहे. सकाळी ११ वाजता नवीन बस स्थानकामागील दोन जलकुंभाचे आणि त्या नंतर शिव नगरमधील एका जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मनपाच्या वतीने तशी कार्यवाही केली जाईल.

जलकुंभावर कसे चढणार?
स्ट्रक्चरल ऑडिट करताना जलकुंभावर चढावे लागणार आहे. बस स्थानकामागील जलकुंभाच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे या पायऱ्यांवरून जाणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे मनपाच्या वतीने जलकुंभावर चढण्यासाठी दुसरी काही व्यवस्था केली जाते का? ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...